पदवीधर मतदार संघासाठी मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रम घोषित पात्र नागरिकांनी मतदार नोंदणी करण्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आवाहन

यवतमाळ दि. 28 सप्टेंबर (जिमाका) : अमरावती पदवीधर मतदार संघाचे विधान परिषद सदस्य यांची मुदत माहे फेब्रुवारी 2023 मध्ये संपत असल्यामुळे पदवीधर मतदार संघ निवडणूक 2023 चे अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम येत्या 1 नोव्हेंबर पासुन सूरू होत आहे. सदर मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत जास्तीत जास्त पात्र व्यक्तींनी मतदार नोंदणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे. पदवीधर मतदार संघाच्या मतदार याद्या प्रत्येक वेळी निवडणूकीपुर्वी नव्याने तयार करणे आवश्यक असल्याने, पात्र व्यक्तींनी विहित नमुन्यात (नमुना 18) नविन अर्ज सादर करावेत. प्रत्येक व्यक्ती जी भारताची नागरिक आहे, आणी त्या मतदारसंघातील सर्वसाधारण रहिवासी आहे आणि ती 1 नोव्हेंबर 2022 पूर्वी (म्हणजे पात्रता तारीख) किमान 3 वर्षे आधी भारताच्या राज्यक्षेत्रातील विद्यापीठाची एकतर पदवीधर असेल किंवा त्याच्याशी समतुल्य असलेली आर्हता धारण करीत असेल अशी प्रत्येक व्यक्ती मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी पात्र आहे. पदवीधर मतदार यादीमध्ये नोंदणीकरीता मतदारांना नमुना 18 चा अर्ज तहसिल कार्यालयामध्ये तसेच मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या https://ceo.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर सुध्दा उपलब्ध आहे. भारत निवडणूक आयोगाने घोषीत केलेल्या मतदार यादीचा पुनरिक्षण कार्यक्रमानुसार मतदार नोंदणी अधिनियमान्वये जाहीर सुचना प्रसिध्द करण्याचा दिनांक 01 ऑक्टोंबर 2022 आहे, तर वर्तमान पत्रातील नोटीसीची प्रथम पुर्नप्रसिध्दी 15 ऑक्टोंबर व द्वितीय प्रसिद्धी 25 ऑक्टोंबर रोजी तसेच दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक 7 नोव्हेंबर आहे. हस्तलिखिते तयार करणे व प्रारूप मतदार यादीची छपाई 19 नोव्हेंबर पर्यंत करून प्रारूप याद्यांची प्रसिध्दी 23 नोव्हेंबर रोजी करावयाची आहे. प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत स्विकारण्यात येतील. सदर दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्याचा दिनांक 25 डिसेंबर असून मतदार यादीची अंतिम प्रसिध्दी दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी करावयची आहे. या मतदार नोंदंणी कार्यक्रमांतर्गत विभागीय आयुक्त, अमरावती हे मतदार नोंदणी अधिकारी असून सहायक मतदार नोंदणी अधिकारी जिल्हाधिकारी हे आहेत. मतदार नोंदणीचे अर्ज हे पदनिर्देशीत उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांचे कडे वर नमुद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे सादर करता येतील, असे उपजिल्हाधिकारी (निवडणूक) डॉ. स्नेहल कनिचे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी