शासनाच्या कर्ज योजनेचा लाभ घेवून जिल्ह्यात निर्यातक्षम उद्योग वाढवा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे उद्योजकांना आवाहन

यवतमाळ, दि. 28 सप्टेंबर (जिमाका):- यवतमाळ जिल्ह्यात औद्योगिक माल निर्यातीकरिता भरपूर वाव असून जिल्ह्यातील युवक व युवतींनी शासनाच्या कर्ज योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेत आपले उद्योग वाढविण्याचे व जिल्ह्यातून निर्यात वाढविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उद्योजकांना केले. उद्योग विभाग महाराष्ट्र शासन आणि जिल्हा उद्योग केंद्र, यवतमाळ यांचे तर्फे यवतमाळ जिल्ह्यातील उद्योजकांसाठी गुंतवणूक वृध्दी कार्यक्रम तसेच निर्यात प्रचलन तसेच एक जिल्हा एक उत्पादन या विषयावर 24 सप्टेंबर रोजी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन हॉटेल झुलेलाल प्राईड, दारव्हा रोड, यवतमाळ येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अमरावती विभागाचे उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम, रेमंड कंपनीचे कार्य संचालक नितीन श्रीवास्तव, मुंबईच्या मैत्री प्रकल्पाचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव, तसेच प्रणय अहिरवार, मृत्युंजय पांडा, नंदकुमार सुराणा हे उपस्थित होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी निर्यातदारांना येणाऱ्या अडचणी लवकरच सोडविण्यात येईल असे आश्वासन दिले. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक निलेश निकम यांनी जिल्ह्यातील निर्यातीचा आलेख पुढील आर्थिक वर्षात कसा वाढवता येईल या विषयावर मार्गदर्शन करून उद्योजकांचे मनोबल वाढविले. या एक दिवसीय कार्यक्रमांमध्ये निर्यातीविषयी तज्ञ मार्गदर्शकांनी मार्गदरर्शन केले. कार्यक्रमाचे आभार उद्योग निरीक्षक श्री गुळमे यांनी केले. या कार्यक्रमाकरिता 150 उद्योजकांनी आपला सहभाग नोंदविला व 20 उद्योजकांनी आपल्याद्वारे निर्मित वस्तूंची प्रदर्शनात मांडणी केली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी