केश कर्तनालय, गेमपार्लर, मनोरंजन केंद्रे 31 मार्चपर्यंत बंद


v प्रार्थनास्थळे, हॉटेल, बँक व प्रवासी वाहतुकीवर निर्बंध
यवतमाळ दि.20 : राज्यात कोरोना विषाणुमुळे (कोविड-19) उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. या विषाणुमुळे उद्भवलेल्या संसर्ग रोगाच्या नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्यात आल्या असून साथरोग अधिनियम - 1897 मधील खंड 2, 3 व 4 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यामधील तरतुदीनुसार प्राप्त अधिकारान्वये जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी नागरिकांची एका ठिकाणी गर्दी होऊ नये यासाठी खालील आदेश पारीत केले आहेत.
त्यानुसार यवतमाळ जिल्ह्यातील सर्व व्हीडीओ गेम पार्लर, पुल गेम, कार्ड क्लब, व्हीडीओ सिनेमा व सर्व सार्वजनिक मनोरंजन केंद्रे, जिल्ह्यातील नागरी व ग्रामीण भागातील सर्व केश कर्तनालय, हेअर सलुन व ब्युटी पार्लर दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत पुर्णत: बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे.
तसेच सर्व मंदिर, मस्जीद, गुरूद्वारा, गिरीजाघर, बौद्ध विहार व इतर धार्मिक व प्रार्थना स्थळाच्या ठिकाणी एका वेळी पाचपेक्षा अधिक भाविक एकत्र जमण्यास 31 मार्चपर्यंत मनाई करण्यात आली आहे.
सर्व प्रकारचे हॉटेल, ढाबा, बेकरी स्वीटमार्ट, चाट भंडार येथे गर्दी जमणार नाही, याची दक्षता घ्यायची असून हॉटेलमध्ये दोन टेबलमधील अंतर किमार 3 फुट असावे. एका टेबलवर दोन ते तीन पेक्षा अधिक व्यक्ती बसणार नाही, शक्यतो पार्सल देण्यात यावे. हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी सॅनेटायजर, हँन्डवॉश, साबन, यासारख्या स्वच्छतेच्यादृष्टीने आवश्यक साधने उपलब्ध करून देण्यात यावीत.
जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफीस, बँकामध्ये मुख्य प्रवेशद्वारावर गार्ड नेमण्यात यावा. पोस्ट ऑफीस व बँकेत जाणारे ग्राहक हे कामकाज चालु असलेल्या एका काऊंटरवर एकावेळी एकच ग्राहक हजर राहील, याची दक्षता घ्यावी. तसेच उर्वरित ग्राहकांना पोस्ट ऑफीस, बँकेच्या बाहेर दोन ते तीन फुटाचे अंतरावर थांबण्याची व्यवस्था करावी. पोस्ट ऑफीस, बँकेच्या प्रत्येक एटीएमसमोर एक गार्ड नेमून एटीएममध्ये एकावेळी एकच ग्राहक प्रवेश करील व उर्वरीत ग्राहकांना दोन ते तीन फुटाचे अंतरावर थांबण्यास सांगतील.
सर्व खाजगी ट्रॅव्हल्स, ॲटो, टॅक्सी, ट्रॅव्हलर इ. वाहनाने प्रवासी वाहतुक करतांना वाहनाच्या बैठक क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणार नाही, तसेच सदर दोन प्रवाशामध्ये सुरक्षीत अंतर ठेवावेत. तथापि कुटुंब प्रवास करत असल्यास व त्यांनी एकत्र प्रवास करण्याचा आग्रह धरल्यास तसा प्रवास अनुज्ञेय करण्यात यावा.
वरील आदेशांचे उल्लघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल संबंधितांवर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
फोटो कॅप्शन : जिल्हाधिकारी यांचा फोटो
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी