कार्यतत्पर राहून आरोग्य यंत्रणेने काम करावे





v जिल्हाधिका-यांनी घेतला आरोग्य विभागाचा आढावा
यवतमाळ, दि. 4 : यवतमाळ जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार फार मोठा आहे. दुर्गम- अतिदुर्गम भागात नागरिकांची वस्ती असल्यामुळे त्यांच्यापर्यंत आरोग्याच्या सुविधा पोहचणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने नेहमी कार्यतत्पर राहून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा द्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण अंतर्गत आरोग्य विभागाचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, शासकीय वैद्यकीय महाविद्यलायाचे अधिष्ठाता डॉ. मिलींद कांबळे, जि.प.प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
आरोग्य यंत्रणांनी  नेहमी कार्यतत्पर राहणे गरजेचे आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यात मातामृत्यु-बालमृत्युचे प्रमाण कमी करा. बोगस डॉक्टरांची माहिती गोळा करून त्यांच्यावर कारवाई करा. आरोग्य विभागाने नेहमी अपडेट राहण्यासाठी प्रशिक्षणच्या कार्यशाळा नियमितपणे घ्याव्यात. यासाठी प्रत्येक भागात एक किंवा दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या नेतृत्वात समितीचे गठण करावे. दैनंदिन कामाच्या व्यतिरिक्त त्या-त्या विषयातील तज्ज्ञ डॉक्टर इतरांना मार्गदर्शन करतील, याचे नियोजन करा.
आरोग्य संस्थेमध्ये बाळंतपण झालेल्या महिलांना 102 क्रमांकाच्या गाडीतून घरपोच पोहचविण्याचे प्रमाण वाढवा. हे उद्दिष्ट 100 टक्केच असले पाहिजे. 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेची नियमित तपासणी करून यातील मुदतबाह्य ठरलेली उपकरणे त्वरीत बदलवून घ्या, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. तसेच अंगणवडीमधील मुलांच्या आरोग्याची माहिती, येथे मिळणारे भोजन आदी बाबी तपासण्यासाठी एका अधिका-याला नियमित तपासणीसाठी पाठवावे, असे निर्देश त्यांनी जि.प.महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले.
यावेळी जिल्हाधिका-यांनी जिल्ह्यातील लसीकरण मोहीम, महिलांची हिमोग्लोबीन तपासणी, मातामृत्यु प्रमाण, बालमृत्यु प्रमाण, जन्मदर-मृत्युदर, जननी सुरक्षा योजना, कुटुंब नियोजन कार्यक्रमाची अंमलबजावणी, जननी शिशु सुरक्षा योजना, राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम, सिकलसेल नियंत्रण, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम, मोबाईल मेडीकल युनीट, 108 रुग्णवाहिका आदी विषयांचा आढावा घेतला.
बैठकीला पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, डॉ. सुभाष ढोले, डॉ. प्रशांत पवार, डॉ. पी.एस.चव्हाण, डॉ. प्रिती दुधे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व वैद्यकीय अधिक्षक आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतांना जिल्हाधिकारी एम.डी.सिंह
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी