‘कोरोना’ उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासनाकडून युध्दस्तरावर प्रयत्न - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह





v जिल्ह्यात तीन जण पॉझेटिव्ह तर 37 जण होम कॉरेंटाईन
यवतमाळ दि.16 : ‘कोरोना’ (कोव्हिड-19) विषाणूच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 लागू करण्यात आला आहे. यानुसार प्रतिबंधात्मक उपायोजनेसाठी संपूर्ण प्रशासन अलर्टवर असून युध्दस्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात असलेल्या तीन जणांचे नमुने पॉझेटिव्ह आले असून संपूर्ण जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यात 37 जणांना होम कॉरेंटाईन करण्यात आले आहे, असे सांगून जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले, 1 मार्च रोजी दुबईवरून तीन कुटुंबातील नऊ जण जिल्ह्यात आले. सुचना मिळाल्यानंतर त्यांना होम कॉरेंटाईन व नंतर 12 मार्च रोजी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. या नऊ जणांचे ‘थ्रोट स्वॅब’ चे नमुने नागपूरला पाठविल्यानंतर यातील एक महिला व एक पुरुष पॉझेटिव्ह निघाले. मात्र एका महिलेचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असतांनाही त्यांना लक्षणे आढळत होती. त्यामुळे त्यांना विलगीकरण कक्षात थांबवून त्यांचे नमुने पुन्हा नागपूरला पाठविण्यात आले. त्यात या महिलेचा रिपोर्ट पॉझेटिव्ह निघाला असून विदेशातून आलेले एकूण तीन जण पॉझेटिव्ह आहेत. तसेच या गटासोबत नसलेला मात्र विदेशातून आलेल्या एका व्यक्तिने प्रशासनाला संपर्क केल्यानंतर त्याला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्यांचे नमुने नागपूरला पाठविल्यानंतर त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आहे, मात्र त्यांच्यात लक्षणे निदर्शनास येत असल्याने त्यांचे नमुने फेरतपासणीसाठी पुन्हा प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
दुबईवरून आलेल्या नऊ जणांपैकी सहा जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह असल्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले असून ते सध्या होम कॉरेंटाईनमध्ये आरोग्य पथकाच्या निरीक्षणाखाली आहे. विदेशाहून आलेल्या लोकांच्या संपर्कात जे नागरिक आले त्यांच्याशी संपर्क करण्याचे काम सुरू आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या तालुक्यात 33 नागरीक होम कॉरेंटाईनमध्ये असून थायलंडवरून परत आलेले तीन आणि अजर बैजाण येथून आलेला एक व्यक्ति यांनी प्रशासनासोबत स्वत:हून संपर्क साधला होता. त्या चारही जणांना होम कॉरेंटाईनमध्ये ठेवण्यात आले असून सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण 37 जण होम कॉरेंटाईमध्ये आहेत. विदेशातून जे नागरिक जिल्ह्यात परत आले आहेत, त्यांनी यंत्रणेशी स्वत: संपर्क करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
होम कॉरेंटाईनमध्ये असलेले नागरिक इतरत्र पळून जाऊ नये, यासाठी तहसील स्तरावर एक पोलिस उपनिरीक्षक व चार पोलिस शिपाई यांचे पथक तयार करण्यात आले आहे. नागरिकांच्या उपचारासाठी तसेच अत्यावश्यक साधनसामुग्री घेण्यासाठी तातडीने आरोग्य विभागाला 50 लक्ष रुपये वळते करण्यात आले असून विभागीय आयुक्तांकडे अतिरिक्त 30 लक्ष रुपयांची मागणी करण्यात येणार आहे. धामणगाव रोडवरील अल्पसंख्यांक वसतीगृहात 100 बेडची व्यवस्था असलेला कॉरेंटाईन कक्ष तयार करण्यात आला असून येथे मुलभूत सुविधा पुरविण्यात आल्या आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व साथरोग नियंत्रण अधिनियम लागू करण्यात आल्यामुळे सर्व विभागांना जबाबदा-यांचे वाटप करण्यात आले आहे. नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत नागरिकांना अवगत करण्यात येत आहे.
आरोग्य विभागाने 07232-239515 क्रमांकाचे कॉल सेंटर चोविस तास सुरू केले आहे. तसेच आवश्यकतेनुसार खाजगी रुग्णालयात कॉरेंटाईन कक्ष व विलगीकरण कक्ष सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आरोग्य यंत्रणेच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या असून यात्रा, उपोषण, धार्मिक कार्यक्रम, गर्दीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहे. कोणताही अधिकारी जिल्हा सोडणार नाही, याचीसुध्दा खबरदारी घेण्यात येत आहे. शासनाच्या आदेशानुसार 31 मार्चपर्यंत आठवडी बाजार तसेच सरकारी व खाजगी अंगणवाड्या बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिका-यांनी दिली.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी