एप्रिलफूलच्या निमित्ताने कोरोनासंदर्भात अफवा पसरवू नका

             
v गंभीर कारवाई करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश
v विलगीकरण कक्षात तीन तर गृह विलगीकरण असणा-यांची संख्या 93
यवतमाळ, दि. 30 : कोरोना विषाणू संसर्गाच्या निमित्ताने जिल्ह्यात आरोग्यविषयक आपात्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच साथरोग नियंत्रण कायदा 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि संचारबंदी लागू असून कलम 144 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. उद्यापासून सुरू होणा-या एप्रिल महिन्याच्या अनुषंगाने एकमेकांना एप्रिल फूल बनविण्याची व अफवा पसरविणा-यांची नागरिकांमध्ये चढाओढ दिसून येते. मात्र सद्यस्थितीत कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर सोशल मिडीयातून किंवा इतरही माध्यमातून अफवा पसरविणा-यांवर गंभीर कारवाई करण्यात येईल, असे आदेश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिले आहे.
कोरोनासंदर्भात सोशल मिडीयातून अफवा पसरविणा-यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. यात कोणाचीही हयगय सहन केली जाणार नाही. नागरिकांनी याबाबत जबाबदारीने वागावे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले आहे. बाहेर राज्यातून आलेल्या व्यक्तिंनी स्वत:हून यंत्रणेला माहिती देण्याचे आवाहन प्रशासनाने वेळोवेळी केले आहे. अशा लोकांनी गृह विलगीकरणात राहणे आवश्यक आहे. मात्र तरीसुध्दा या नियमाला बगल देत यवतमाळ प्रशासनातील एक वरिष्ठ अधिकारी दिल्लीवरून परत आल्यानंतर बाहेर फिरतांना आढळून आल्याने जिल्हाधिका-यांनी संबंधित अधिका-याला सक्तीने गृह विलगीकरणात ठेवण्याचे आदेश दिले आहे. याबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिका-यांनी दिला.
येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात एकूण तीन जण दाखल असून यात एकाचे नमुने निगेटिव्ह आले असून लक्षणे असल्यामुळे त्यांना येथेच ठेवण्यात आले आहे. तर इतर दोघांचे नमुने चाचणीसाठी आज (दि.31) पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात गृह विलगीकरणात असलेल्या नागरिकांची संख्या 93 आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी