कोरोना संदर्भात जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू


v जिल्हाधिका-यांनी दिले आदेश
v टोल फ्री क्रमांक 104 कार्यान्वित
यवतमाळ दि.11 : कोरोना विषाणुचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी यवतमाळ शहर व जिल्हयामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे.  त्यामुळे आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाल्यास आणि आवश्यकता भासल्यास खासगी रुग्णालय,  डॉक्टर आणि रुग्‍णालयातील यंत्रसामग्री अधिग्रहित करण्यात येणार आहे.
आंतरराष्ट्रीय स्तरावर तसेच देशांतर्गत कोरोना विषाणू संसर्गबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात येऊन त्यावर नियंत्रण करणे व विषाणूंच्या संसर्गात अधिक वाढ होऊ नये म्हणन तात्काळ उपाययोजना करणे आवश्यक झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे प्रमुख म्हणून जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी यवतमाळ जिल्हयात हा कायदा लागू केल्याचे आदेश बुधवारी दिले. याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार  वारे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण यांची सनियंत्रक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . 
याअंतर्गत औषध विक्रेते यांनी जास्त भावाने मास्क विक्री केल्यास किंवा औषधांची साठेबाजी करतांना आढळल्यास त्यांच्याविरूद्ध तसेच चुकीचे समज पसरविणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याचे आदेश सनियंत्रक यांना देण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा शोध घेवून त्यांना निरिक्षणाखाली ठेवणे,कोरोना विषाणूचा संसर्ग लक्षात घेता लघु कृती प्रमाणित कार्यपध्दती तयार करणे, कोरोना विषाणुचा संसर्ग जिल्ह्यात वाढू नये, यासाठी उपाययोजना आखणे, आरोग्य विभागाने तयार केलेली मार्गदर्शक पुस्तिकेचे पालन करणे, स्वतंत्र वैद्यकीय पथके तयार करून पूर्ण वेळ तैनात ठेवणे, संशयीत रुग्णांसाठी स्वतंत्र ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करणे, कोरोना विषाणुचा संसर्ग माहितीसाठी स्वतंत्र माहिती कक्ष व मदत केंद्राची स्थापना करणे, टोल फ्री क्रमांक 104 कार्यान्वीत करणे, राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक व राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 या क्रमांकाची माहिती सर्वसामान्य नागरिपर्यंत पोहचविणे या जबाबदाऱ्यादेखील सनियंत्रक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी कळविले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी