नागरिक मदत कक्षाच्या माध्यमातून प्रशासनाच्या विविध उपाययोजना

       
    
v बाहेरून आलेल्यांना स्वत:हून माहिती देण्याचा मॅसेज
v अडकलेल्यांसाठी भोजन व राहण्याची व्यवस्था
यवतमाळ, दि. 30 : संपूर्ण राज्यात तसेच जिल्ह्यात संचारबंदी लागू असल्यामुळे अनेक जण अडकून पडले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक इतर ठिकाणी तर इतर ठिकाणचे नागरिक यवतमाळ जिल्ह्यात आहेत. त्यामुळे त्यांच्या राहण्या व खाण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने सामाजिक संघटनांच्या माध्यमातून अशा लोकांसाठी उपाययोजना करण्यात येत आहे. तसेच बाहेर देशातून किंवा इतर राज्यातून किंवा दुस-या जिल्ह्यातून यवतमाळ जिल्ह्यात आलेल्या नागरिकांना येथील यंत्रणेस स्वत:हून माहिती देण्याचा मॅसेज राष्ट्रीय सुचना व माहिती केंद्राच्या माध्यमातून पाठविण्यात येत आहे. जेणेकरून अशा लोकांमुळे इतरांना संसर्ग होणार नाही व प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांच्यावर निगराणी ठेवता येईल.
जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या सुचनेवरून जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर नागरिक मदत कक्ष तयार करण्यात आला आहे. 50 लोकांची चमू यासाठी कार्यरत असून सरासरी दिवसाला 300 कॉल या माध्यमातून प्रशासकीय यंत्रणेला येतात. त्यातूनच सर्व माहिती प्रशासनाकडे गोळा होत आहे.
 जिल्ह्यातील बाहेर राज्यात अडकलेले, आपल्या जिल्ह्यातील महाराष्ट्रात इतर जिल्ह्यात अडकलेले आणि इतर जिल्ह्यातील व राज्यातील यवतमाळ जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांचा प्रशासनाच्यावतीने नियमित फॉलो-अप सुरू आहे. जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांच्या राहण्याची व भोजनाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने सामाजिक संघटनांच्या माध्यमातून करण्यात येत आहे. तसेच विदेशातून आलेले आणि मुंबई, पुणे व इतर शहरातून आलेल्या नागरिकांना दररोज राष्ट्रीय माहिती व सुचना केंद्र (एनआयसी) च्या माध्यमातून एसएमएसद्वारे प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
30 मार्चपर्यंत यवतमाळ जिल्ह्यातील बाहेर राज्यात अडकून पडलेल्या नागरिकांची संख्या 574 आहे. या नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाकडून इंग्रजी भाषेतून मजकूर तयार करून राज्य समन्वय ग्रुपमध्ये शेअर केला जातो. या ग्रुपकडून सदर माहिती त्या-त्या राज्यांना वितरीत करण्यात येते. जेणेकरून यवतमाळ जिल्ह्यातील नागरिकांना त्या-त्या संबंधित राज्यात तेथील प्रशासनाकडून मदत मिळेल.
महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात यवतमाळ जिल्ह्यातील 1922 नागरिक अडकले आहेत. या नागरिकांच्या मदतीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी कार्यालयामार्फत संबंधित जिल्ह्यांच्या प्रशासनाला दररोज माहिती सादर करण्यात येते. यात नागरिकांचे मोबाईल क्रमांकसुध्दा देण्यात येत आहे. या नागरिकांना त्या-त्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडून मदत देण्याबाबत सुचित करण्यात येत असून अशी मदत त्यांना मिळत आहे.
इतर राज्यातील व जिल्ह्यातील यवतमाळ जिल्ह्यात अडकलेल्या नागरिकांची संख्या 2353 आहे. यापैकी 1903 नागरिकांची राहण्याची त्यांची स्वत:ची व्यवस्था असल्यामुळे उर्वरीत 450 नागरिकांची राहण्याची व्यवस्था प्रशासनाने केली आहे. तर सर्व 2353 नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था जिल्हा प्रशासनाच्या पुढाकाराने सामाजिक संघटनांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
मुंबई, पुणे व इतर शहरांमधून आलेल्या नागरिकांना स्वत:ची माहिती यंत्रणेस सांगण्याकरीता राष्ट्रीय सुचना व माहिती केंद्राच्या (एनआयसी) माध्यमातून मॅसेज पाठविण्यात येत आहे. 30 मार्चपर्यंत एकूण 4527 नागरिकांना 12335 मॅसेज पाठविण्यात आले आले आहे. यात बाहेरून आलेल्या नागरिकांनी कमीत कमी 14 दिवस आपल्याच घरी विलगीकरण कक्षात राहावे. ताप, सर्दी, खोकला व इतर कोरोनाची लक्षणे आढळल्यास तात्काळ जवळच्या ग्रामीण रुग्णालयात अथवा जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, यवतमाळ यांचे दूरध्वनी क्रमांक 07232-239515 वर माहिती द्यावी. अथवा जिल्हा नियंत्रण कक्ष 07232-240720 व टोल फ्री क्रमांक 1077 वर संपर्क साधावा, असा मॅसेज पाठविण्यात येत आहे.
या सर्व बाबींचा जिल्हा प्रशासनाच्यावतीने नियमित फॉलो-अप घेण्यात येत असून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण यंत्रणा दिवसरात्र प्रयत्नशील आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी