कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज - जिल्हाधिकारी एम.डी.सिंह


Ø नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन
यवतमाळ, दि. 5 : कोरोना व्हायरस (कोव्हीड - 2019) ने सध्या संपूर्ण जगात संकट उभे केले आहे. यापासून बचावासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रशासनाला अलर्ट राहण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनीसुध्दा जिल्हा प्रशासनाला आवश्यक खबरदारी घेण्याच्या सुचना केल्या असून कोरोनाचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी म्हटले आहे.
कोरोनाबाबत काळजी घेण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून या रोगाची लक्षणे आढळताच नागरिकांनी ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे त्वरीत उपचारासाठी दाखल व्हावे. आजपावेतो कोरोनाचा एकही संशयित रुग्ण जिल्ह्यात आढळून आला नाही. त्यामुळे नागरिकांनीसुध्दा भीती बाळगण्याची आवश्यकता नाही. मात्र याबाबत दक्ष राहून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाच्यावतीने उपजिल्हा रुग्णालय स्तरावर कॉरेंटाईन वॉर्ड (विलगीकरण कक्ष) तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आयसोलेशन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याशिवाय नागरिकांच्या शंकांचे निराकरण करण्यासाठी जिल्ह्यात ‘104’ हा टोल फ्री क्रमांक चोवीस बाय सात कार्यरत करण्यात आला आहे. सोबतच जिल्हाधिकारी कार्यालयात नोडल अधिकारी आणि नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क करून नागरिकांना शंका-कुशंकाचे निराकरण करता येणार आहे.
सोशल मिडीयाच्या माध्यमातून कोरोना व्हायरसबाबत अनेक अफवा पसरविण्यात येत आहे. नागरिकांनी या अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास टोल फ्री क्रमांकावर किंवा वरील सदस्यांना संपर्क करावा. कोरोनाबाबत नागरिकांनी काळजी घेणे हेच सर्वोत्तम औषध आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत नागरिकांनी  साबणाने व पाणी वापरून हात स्वच्छ धुणे, शिंकतांना, खोकलतांना व बाहेर फिरतांना नाकावर तोंडावर रुमाल लावणे, सर्दी व फ्ल्यू सदृष्य लोकांशी संपर्क टाळणे, गर्दी असलेले कार्यक्रम, मंदीर परिसरातील कार्यक्रमाला न जाणे, असे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले.

कोरोना आजाराची लक्षणे प्रामुख्याने सर्दी, खोकला, गंभीर स्वरुपाच्या श्वसन संस्थेचे लक्षणे, अचानक येणारा तिव्र ताप, घसा येणे, गिळायला त्रास होणे, दम लागणे, निमानिया, पचनसंबंधी लक्षणे, अतिसार, मुत्रपिंड रिकामे होणे आदी लक्षणे आहेत.
   

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी