धामणगाव (देव) येथील विकासकामांचा पालकमंत्र्यांकडून आढावा







v मुंगसाजी  महाराज पुण्यतिथीनिमित्त पालकी सोहळ्यास उपस्थिती
यवतमाळ, दि. 2 : मुंगसाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त दारव्हा तालुक्यातील श्रीक्षेत्र धामणगाव (देव) येथे राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पालकी सोहळ्यास उपस्थित राहून दर्शन घेतले. तसेच धामणगाव (देव) येथे भक्तांसाठी करण्यात आलेल्या विविध विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला.
यावेळी बोलतांना पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, श्रीक्षेत्र धामणगाव (देव) विकास आराखड्यासाठी सुरवातीला सहा कोटी मंजूर करण्यात आले होते. यात वाढ करून पुन्हा 19 कोटी असे एकूण 25 कोटींची  विविध विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. येथे येणा-या महिला भक्तांसाठी प्रसाधनगृहाचे काम त्वरीत पूर्ण करा. भविष्यात येथे हेलिपॅडचेसुध्दा नियोजन करण्यात यावे. येथील लॉनवर सावली देणारे आंबा, कडूनिंब आदी झाडींची लागवड करावी. विकास कामे करतांना जुने झाड न कापता त्याला हस्तांतरीत करावे. भक्तांच्या पालखी रस्त्याचे काम पूर्ण करावे. 25 कोटींच्या दुस-या टप्प्यात मुख्य मंदीर, चिंच देवस्थान आदींची कामे प्राधान्याचे हाती घ्यावी. याबाबत कामाचे नियोजन तयार करून शासनाकडे पाठविल्यास त्वरीत मंजूरी घेता येईल, आदी सुचना त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार यांनी सादरीकरण केले. यात सुरवातीच्या सहा कोटीमध्ये 1300 मीटर लांब व 4 मीटर रुंद पालखी मार्गाचे बांधकाम 1 कोटी रुपये, धामणगाव ते कोहळा रस्त्याचे दुपदरीकरण 2 कोटी रुपये, बहुउद्देशीय सभागृह, प्रसाधनगृह व प्रवेशद्वार बांधकाम 3 कोटी रुपये या कामांचा समावेश आहे. याशिवाय उर्वरीत 19 कोटींच्या कामांमध्ये दर्शन बारी बांधकाम करणे, सामुहिक प्रसाधनगृहाचे बांधकाम करणे, राम मंदीर समोरील खुल्या जागेमध्ये सभामंडप बांधकाम करणे, भोजन कक्षाचे बांधकाम करणे, बाल उद्यान, पॅराग्लोज व शेडसह इतर बाबीचे बांधकाम करणे, मुख्य मंदीर परिसरातील भक्त निवासाचे बांधकाम करणे, चिंच मंदीर परिसरातील भक्त निवासाचे बांधकाम करणे, सीसीटीव्ही कॅमेरे व पोलिस चौकीचे बांधकाम करणे, पाणी पुरवठा व्यवस्था करणे, विद्युत पुरवठा व्यवस्था करणे आदींचा समावेश आहे.
बैठकीला सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार, दारव्हा पंचायत समितीच्या सभापती सुनिता राऊत, जि.प.सदस्या आश्विनी कुरसंगे, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी, उपविभागीय अधिकारी इब्राहीम चौधरी, उपविभागीय पोलिस अधिकारी उदयसिंग चंदेल, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री आदी उपस्थित होते.
००००००००


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी