‘कोरोना’ प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत हलगर्जीपणा नको –जिल्हाधिकारी एम.डी.सिंह








Ø सर्व यंत्रणेने अलर्ट राहण्याच्या सुचना
यवतमाळ दि.13 : ‘कोरोना’ (Covid-१९) विषाणू संसर्गाबाबत राज्य शासन अलर्ट झाले असून वरिष्ठ स्तरावरून जिल्हा प्रशासनाला वारंवार सुचना येत आहे. या सुचनांचे पालन जिल्हा मुख्यालय ते गाव स्तरापर्यंतच्या सर्व यंत्रणांनी करणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदासुध्दा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे ‘कोरोनो’ संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सर्व यंत्रणेला दिले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियोजन सभागृहात महसूल, आरोग्य, जिल्हा परिषद, नगर पालिका प्रशासन व इतर सर्व यंत्रणांची बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे सर्व यंत्रणांनी काटेकोरपणे पालन करावे, असे सांगून श्री. सिंह म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोरोना’ ला जागतिक साथ घोषित केले आहे. त्यामुळे राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांना अलर्ट राहण्याच्या सुचना केल्या आहेत. याबाबत वरिष्ठ स्तरावरून दैनंदिन आढावा घेण्यात येत आहे. विदेशातून यवतमाळमध्ये आलेल्या ‘त्या’ नागरिकांमध्ये कोणतेही लक्षणे आढळून आली नसली तरी सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासन ‘हायअलर्ट’ वर असून प्रशासनाच्यावतीने वेगवेगळ्या विभागांना जबाबदा-या निश्चित करून देण्यात आल्या आहेत. या जबाबदा-या गांभिर्याने पार पाडा, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
यवतमाळ शहरात कॉरेंटाईनसाठी अल्पसंख्यांक मुलींच्या वसतीगृहात 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तेथे स्वच्छतेसह सर्व सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात. उपविभागीय तसेच तालुका स्तरावर अद्यापही ज्या अधिका-यांनी यंत्रणेची बैठक घेतली नसेल त्यांनी ती त्वरीत घ्यावी. आपल्या स्तरावरील यंत्रणेची बैठक न घेणे ही गंभीर बाब आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना, जनजागृती, आदी सर्व विषयांचे बैठकीत सुक्ष्म नियोजन करा. आपापल्या न.प. हद्दीतील होर्डींग्जवर त्वरीत फ्लेक्स लावा. यात्रा, मोठ्या प्रमाणात होणारे धार्मिक कार्यक्रम, महोत्सव रद्द करण्यासाठी केवळ तोंडी सुचना किंवा पत्र पाठवून मोकळे होऊ नका. तर आयोजकांची बैठक घेऊन त्यांना विश्वासाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत अवगत करा. असे मोठे कार्यक्रम रद्द झाले की नाही, याची खात्री करून घ्या. आयोजक ऐकत नसेल तर कायद्यातील अधिकाराचा उपयोग करा. कोरोनावर विशिष्ट पध्दतीचे उपचार नाही. प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आवश्यक काळजी घेणे, हेच उपचार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी याकडे गांभिर्याने लक्ष द्यावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे सादरीकरण करतांना म्हणाल्या. आजघडीला जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण नाही. जिल्हाधिकारी यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीबाबत दर दोन-तीन तासाला आढावा घेतला जात आहे. विदेशातून जिल्ह्यात दाखल झालेले किंवा होणा-या नागरिकांना कॉरेंटाईन करण्यात येणार आहे. तालुका व गावपातळीवरील आरोग्य यंत्रणेने कमीतकमी दहा बेडची व्यवस्था असलेली कॉरेंटाईनची जागा त्वरीत शोधून तसा अहवाल तातडीने पाठवावा. यावेळी त्यांनी शासनाकडून मिळालेल्या सुचनांबाबत उपस्थितांना अवगत केले. अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे म्हणाले, सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 12 बेडचे आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहे. गरजेनुसार आयसोलेशन बेडची संख्या 24 पर्यंत वाढविण्यात येईल. यानंतरसुध्दा आवश्यकता वाटली तर इतर खाजगी रुग्णालयात आयसोलेशन वॉर्ड तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी केले. बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, तालुका आरोग्य अधिकारी, इंडियन मेडीकल असोसिएशन, निमा संघटना, संजीवन तसेच क्रिटीकेअर रुग्णालयाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.  
०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी