प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ‘ते’ नागरिक आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल


यवतमाळ दि.12 : विदेशातून यवतमाळमध्ये परतलेल्या ‘त्या’ नऊ नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून स्व.वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या सुचनेवरून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी दिली.
या नागरिकांच्या पुढील उपचारासाठी थ्रोट स्वॅबचे नमुने नागपूर येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीसाठी पाठविण्यात येणार आहे. Covid-१९ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विदेशातील सहलीवरून यवतमाळमध्ये परतलेल्या त्या नऊ नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागाने त्यांच्या घरातच निरीक्षणाखाली ठेवले होते. आता मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी तसेच त्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉडमध्ये ठेवण्यात आले आहे.
Covid-१९ विषाणुचा संभावित संसर्ग रोखण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्थेमध्ये जनजागृतीबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कोणत्याही मास्कचा वापर न करता साधा धुतलेला रुमाल शिंकतांना किंवा खोकलतांना लावावा. तसेच आपल्या आजुबाजूचा परिसरात स्वच्छता ठेवावी. जत्रा, यात्रा, महोत्सव, गर्दीचे ठिकाणी जाणे टाळावे, अशा सुचना जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आल्या आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आलेल्या नऊ नागरिकांमध्ये कोणतेही लक्षण दिसून आले नाही. त्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती गोळा करण्याचे काम सुरू असून त्याचा नियमित फॉलोअप घेण्यात येईल. आयसोलेशन कक्षात असलेल्या या नागरिकांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात येतील व त्यानंतर उपचाराची रुपरेषा ठरेल, असे जिल्हा शल्य चिकित्सक आणि अधिष्ठाता यांनी सांगितले.
जे नागरिक कोणत्यातरी माध्यमातून संपर्कात आले असतील त्यांनी स्वत:च घरात सेल्फ कॉरेंटाईन करावे. इतरांशी संपर्कात येऊ नये. जिल्ह्यात तीन ठिकाणी कॉरेंटाईन कक्ष स्थापन करण्यात आले आहे. यवतमाळ येथे धामणगाव रोडवर अल्पसंख्याक वसतीगृह येथे 100 जणांचा कॉरेंटाईन कक्ष स्थापन करण्यात आला आहे, अशी माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.  

Covid-१९ संदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना :
Covid-१९  विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनासंदर्भात आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 अन्वये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हे प्राधिकरणाचे पदसिध्द अध्यक्ष आहेत.
     जिल्हा स्तरावर Covid-१९  विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी तसेच इतर विभागांशी समन्वय साधण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ललितकुमार व-हाडे यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सदर समितीमध्ये सह नोडल अधिकारी म्हणून डॉ. एस.के. डोईफोडे तर सदस्य म्हणून महसूल विभागाच्या तहसीलदार भाग्यश्री देशमुख, यवतमाळचे तहसीलदार कुणाल झाल्टे, जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार अजय गौरकार, सहाय्यक अधिक्षक गिरीश राठोड आणि सतीश मून यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

०००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी