विलगीकरण कक्षातील नागरिकांच्या प्रकृतीत सुधारणा


v तीन पॉझेटिव्ह रुग्णांसह एकूण पाच नागरिक दाखल
v खाजगी आस्थापना 31 मार्चपर्यंत बंद
यवतमाळ दि.21 : स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विलगीकरण कक्षात असलेल्या नागरिकांच्या प्रकृतीत सुधारणा असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांनी सांगितले. सद्यस्थितीत विलगीकरण कक्षात एकूण पाच जण दाखल असून यातील तीन जणांचे नमुने पॉझेटिव्ह आहेत. तर इतर दोघांचे नमुने आज (दि. 21) नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. हे दोन्ही नागरिक दि. 20 रोजी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात होम कॉरेंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या 137 झाली आहे.
जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापना 31 मार्चपर्यंत बंद : जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात कोरोना  (कोव्हिड - 19) वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हृयातील सर्व खाजगी आस्थापना 31 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खाजगी आस्थापना दि. 21 ते 31 मार्चपर्यंत या कालावधीत बंद राहतील. केवळ अत्यावश्यक सेवा पुरविणा-या आस्थापना जसे पाणी पुरवठा, स्वच्छता विषयक सेवा, बँकींग सेवा, दूरध्वनी व संचार सेवा, रेल्वे व वाहतूक सेवा, अन्न, भाजीपाला व किराणा माल सेवा, दवाखाना, वैद्यकीय केंद्र , औषधालय, वीज, पेट्रोलियम ऑईल ॲन्ड एनर्जी, आवश्यक सेवेसाठी दिल्या जाणा-या आयटी सेवा सुरू राहतील.
तसेच उत्पादन करणा-या खाजगी युनीटमध्ये केवळ पाच टक्के मनुष्यबळ वापरून ही सेवा सुरू ठेवता येणार आहे. वरील आस्थापनेवरील आजारी कामगार इतर कामगारांच्या संपर्कात येणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच कंपनीत निर्जंतुकीकरण करणेबाबत, आस्थापनेत काम करणा-या कामागारांच्या आरोग्याविषयी आवश्यक ती दक्षता व खबरदारी संबंधित आस्थापनांनी घेणे गरजेचे आहे. या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सुचना प्रशासनाने दिल्या आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधितांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील 51 (बी), भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना आदेश : जिल्ह्यातील सर्व खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना पुढीलप्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.
खाजगी रुग्णालयातील बाह्यरुग्ण तपासणी सेवा  पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात यावी. पूर्व नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी. आंतररुग्ण विभागातील सेवा तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सेवा चालू राहतील. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीने आवश्यकता भासल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 65 चा वापर करून खाजगी वैद्यकीय व्यावसायिक, त्यांचे अधिनस्त्‍ कर्मचारी व इमारत आणि परिसर अधिग्रहीत करण्यात येऊ शकतो.
सदर आदेशाचे काटेाकोरपणे पालन न केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 51 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
00000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी