पॉझेटिव्ह टेस्ट असलेल्या तिघांची प्रकृती स्थीर



v बार ॲन्ड रेस्टॉरंट बंद मात्र जीवनावश्यक वस्तुंची दुकाने राहणार सुरू                       
यवतमाळ दि.18 : येथील स्व. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्षात एकूण सात जण दाखल झाले आहेत. यापैकी पॉझेटिव्ह रिपोर्ट असलेल्या दोन महिला आणि एका पुरुषाची प्रकृती स्थीर असून त्यांच्यात सुधारणा होत असल्याचे जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी सांगितले. तसेच विलगीकरण कक्षात असलेल्या दोन जणांचे रिपोर्ट अप्राप्त असून एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे. तर एकाचे स्वॅब नमुने उद्या  (दि. 19) नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात होम कॉरेंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एकूण 105 वर पोहचली आहे. आरोग्य विभागाच्या  पथकाकडून त्यांच्यावर औषधोपचार करण्यात येत आहे. तसेच ते होम कॉरेंटाईन असल्यामुळे घरातच राहतात की बाहेरच्या संपर्कात येतात, यासाठी नगर पालिका पथक आणि पोलिस विभागाच्या पथकाकडून त्यांच्यावर नियमित निगराणी ठेवली जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी आपल्या भागात आलेल्या विदेशातील लोकांची माहिती प्रशासनाला कळवावी. जेणेकरून कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना वेळीच करणे शक्य होईल. विदेशातून आलेल्या लोकांनी स्वत:हूनच यंत्रणेशी संपर्क करावा. यासाठी आरोग्य विभागाचा दूरध्वनी क्रमांक 07232-239515, जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 07232-240720 किंवा टोल फ्री क्रमांक 104 वर संपर्क साधावा, असे आवाहनही प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील मद्यविक्री दुकाने व बार पुढील आदेशापर्यंत बंद
जिल्ह्यात कोरोना (कोव्हिड - 19) विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर साथरोग अधिनियम, 1897 मधील खंड 2, 3 व 4 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. साथरोग प्रतिबंधात्मक कायदा मधील तरतुदीनुसार जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी एका आदेशान्वये जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातील तसेच जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रातील सर्व बार व रेस्टॉरंट, सीएल-3 अनुज्ञप्ती (देशी दारू किरकोळ विक्री), एफएल-2 (विदेशी दारू विक्री), एफएल-3(बार), एफएल-4(क्लब) पुढील आदेशापर्यंत पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे.
या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
मात्र किराणा दुकाने, भाजीपाला, दुध व इतर जीवनावश्यक वस्तुंची दुकाने आपल्या नियमित वेळेपर्यंत सुरू राहणार आहेत. याची नागरिकांनी दखल घ्यावी, असे प्रशासनाने कळविले आहे. 

०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी