आगामी उन्हाळ्यात टँकरमुक्तीचे उद्दिष्ट – जिल्हाधिकारी एम.डी.सिंह





v पाणी टंचाई आढावा बैठकीत अधिका-यांना दिले स्पष्ट निर्देश
v सर्व महसूल मंडळात ‘मिशन उभारी’ अंतर्गत कार्यशाळा घेण्याच्या सुचना
यवतमाळ, दि. 2 : आगामी काळात जिल्ह्यात पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार नाही यासाठी सर्व उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी आपापल्या भागात आतापासूनच उपाययोजना कराव्यात. टँकरमुक्त जिल्हा करण्याचे उद्दिष्ट ठेवून सर्वांनी युध्दस्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. यात कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी अधिका-यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुळकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी सर्वश्री अनिरुध्द बक्षी, इब्राहीम चौधरी, व्यंकट राठोड, डॉ. शरद जावळे, शैलेश काळे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, जि.प. ग्रामीण पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप कोल्हे आदी उपस्थित होते.
गतवर्षी जिल्ह्यात 72 टँकरने लावण्यात आले होते. मात्र यावेळी जिल्हा प्रशासनाकडून एकाही टँकरला परवानगी देण्यात येणार नाही. त्यासाठी आपापल्या भागात पाण्याचे स्त्रोत, योग्य उपाययोजना आतापासून करा. गाळ काढणे, बोअरवेल दुरुस्त करणे, विहीर अधिग्रहण अशा ज्या ज्या उपाययोजना शक्य आहे, त्या त्वरीत अमलात आणा. गतवर्षी ज्या गावांत टँकर लावण्यात आले होते, अशी सर्व गावे टँकरमुक्त्‍ झाली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी त्यांनी अरुणावती, अडाण, पुस, वाघाडी, सायखेडा आदी धरणामधील मृत पाणीसाठाबाबत विचारणा केली. तसेच लोकांना गरजेनुसार पाणी पुरविण्यासाठी आपापल्या स्तरावर काय उपाययोजना केल्या, याबाबतसुध्दा माहिती घेतली. संबंधित गावाची लोकसंख्या किती, पाण्याचे स्त्रोत कोणते, पाणी कसे पुरविणार. आतापर्यंत किती उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आपापल्या भागात पाणी टंचाई आढावा बैठका घेतल्या. भुजन सर्वेक्षण विकास यंत्रणेचे समोरच्या काळात नियोजन काय, या विषयांवरसुध्दा त्यांनी विचारणा केली. तसेच संबंधित यंत्रणेने त्वरीत पाणी टंचाईच्या आढावा बैठका घ्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.

‘मिशन उभारी’ अंतर्गत सर्व महसूल मंडळात कार्यशाळेचे नियोजन : जिल्ह्यात एकूण 110 महसूल मंडळे आहेत. या सर्व महसूल मंडळात शेतकरी आणि नागरिकांसाठी कार्यशाळा घेऊन त्यांना ‘मिशन उभारी’अंतर्गत्‍ मार्गदर्शन करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. या कार्यशाळेत गटविकास अधिकारी, तहसीलदार, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक आदींनी सादरीकरण करावे. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी ‘मिशन उभारी’ व बळीराचा चेतना अभियानांतर्गत ज्या सुचना आहेत, त्या आधारावर या कार्यशाळा घेण्यात येतील. यात प्रामुख्याने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना, आयुष्यमान भारत, सुवर्ण जयंती राजस्व अभियान, पीएम-किसान, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना, संजय गांधी योजना, घरकुल योजना आदींचा समावेश असला पाहिजे.
तसेच येत्या दोन-तीन दिवसांत तालुका स्तरावर ‘सिंगल विंडो’सिस्टीम सुरू करून मिशन उभारी योजनेंतर्गत सर्व माहिती नागरिकांना एकाच छताखाली मिळण्यासाठी तातडीने नियोजन करा. जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचा आकडा शुन्यावर आणणे, हेच आपले ध्येय आहे, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. 
०००००००००

Comments

  1. वरील लेख सुस्पस्ट वाचता येत नाही कृपया त्यात सुधारणा करा.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी