कोरोना संसर्गासंबंधात पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक






v सर्व यंत्रणांनी अलर्ट राहण्याच्या सुचना
यवतमाळ दि.16 : ‘कोरोना’ (कोव्हिड-19) विषाणूच्या संसर्गाबाबत राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासन, महसूल विभाग, आरोग्य विभागाची आढावा बैठक घेतली. विदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये कोरोनाची अंशत: लक्षणे आढळल्याने संपूर्ण यंत्रणेने अलर्ट राहून गांभिर्याने काम करावे, अशा सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विलगीकरण कक्ष सर्व साधनसामुग्रीने सुसज्ज ठेवा, असे सांगून पालकमंत्री श्री. राठोड म्हणाले, विदेशातून आलेले नागरिक ज्या ज्या ठिकाणी इतरांच्या संपर्कात आले असतील त्या सर्वांची माहिती घ्या. तसेच बाहेरच्या देशातून आलेल्या नागरिकांनी स्वत:हून यंत्रणेशी संपर्क साधला तर त्यांच्यावर उपचाराची दिशा, नमुने पाठविणे आदी बाबी सोप्या होतील. तसेच या विषाणूचा संसर्ग इतर ठिकाणी होणार नाही.
ग्रामीण तसेच शहरी भागातील सर्व आरोग्य यंत्रणेच्या व इतर संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचा-यांनी मुख्यालयीच राहावे. गावापासून तालुक्यापर्यंत आणि तालुक्यापासून जिल्हा मुख्यालयापर्यंत संबंधित कामाच्या सर्व जबाबदा-या वाटून द्या. आरोग्य विभागाला नियोजन समितीमधून तातडीने 50 लक्ष रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहे. हा निधी वैद्यकीय साधनसामुग्री, मास्क, औषधोपचार, जनजागृती आदी कामांसाठी तातडीने खर्च करा, असे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी श्री.सिंह म्हणाले, जिल्ह्यात विदेशातून आलेल्या लोकांचेच नमुने पॉझेटिव्ह आले आहेत.  सद्यस्थितीत आपण स्टेज वन वर आहोत. त्यामुळे घाबरुन जाता कामा नये. मात्र खबरदारीच्या सर्व उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी संपूर्ण प्रशासन प्राधान्याने काम करीत आहे. हॉटेलमधील टेबलाची व्यवस्था अंतरावर करण्याच्या तसेच स्वच्छता ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.
बैठकीला उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ. बाबा येलके, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, संजीवनी हॉस्पीटलचे डॉ. सुनील अग्रवाल, तहसीलदार कुणाल झाल्टे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज तगडपिल्लेवार यांच्यासह इतरही विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी