कोरोनाचे संकट अधिक वाढू नये यासाठी दक्षता घ्या




v मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हीसीद्वारे आढावा
यवतमाळ दि.16 : ‘कोरोना’ (कोव्हिड – 19) या विषाणूने संपूर्ण जगाला व्यापले आहे. काही देशात अधिक तर काही देशात त्याचा कमी प्रभाव आहे. आपल्या राज्यात विदेशातून आलेल्या लोकांमध्ये हा संसर्ग आढळून आला आहे. पॉझेटिव्ह नमुने आलेल्या नागरिकांमध्ये तीव्र स्वरुपाची लक्षणे नाही, ही सुदैवाची बाब आहे. तरीसुध्दा कोरोनाचे संकट अधिक वाढू नये, यासाठी सर्व जिल्हा प्रशासनाने दक्षता घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.
मुंबई येथून व्हीसीद्वारे त्यांनी कोरोना संसर्गाबाबतचा आढावा घेतला. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, कोरोनाबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जागरुकता आली आहे. रस्त्यावरची गर्दी कमी झाली असून गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे नागरिक टाळत आहेत. तरीसुध्दा प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी अधिक सजग राहणे व दक्षता घेणे आवश्यक आहे. लक्षणांची तीव्रता सुदैवाने कमी आहे. ज्या नागरिकांचे नमुने पॉझेटिव्ह आले आहेत, त्यांना मानसिक आधार देणे गरजेचे आहे. मनाने ते खचून जाता कामा नये.
जनतेसाठीच आपण हे सर्व काही करीत आहोत, हे जनतेला पटवून द्या. आंदोलने, धार्मिक कार्यक्रम, उत्सव, मोठे कार्यक्रम, मंदीर, मशीद, चर्च आदी ठिकाणी गर्दी होऊ न देण्याचे आवाहन आयोजकांना करा. अशा परिस्थितीत ‘काय करावे आणि काय टाळावे’ हे सर्वांना समजावून सांगा. नारिकांना कमीतकमी ठिकाणी फिरण्याचे आवाहन करा. पुढचे 15 दिवस जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. या विषाणूची आपल्याकडे थेट लागण नाही. परदेशातून आलेल्या व्यक्तिंना याचा संसर्ग झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सदैव जागृत रहा, अशा सुचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी