कोरोना : परिस्थिती नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिकारी फिल्डवर


v तालुकानिहाय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या
यवतमाळ दि.18 :  कोरोना विषाणुचा (COVID - 19 ) संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन ‘हायअलर्ट’ वर आहे. जिल्हास्तरावरून देण्यात आलेल्या सुचनांची योग्य प्रकारे अंमलबजावणी तसेच या रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक त्या उपाययोजना गाव व तालुकास्तरावर होते की नाही, यासाठी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांच्या आदेशान्वये वरिष्ठ अधिका-यांना फिल्डवर पाठविण्यात आले आहे. यात उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी आदींचा समावेश असून तालुकानिहाय त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. नागरी भागाचे नियंत्रण अधिकारी म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर तर ग्रामीण भागाचे नियंत्रण अधिकारी म्हणून जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.
कोरोना विषाणू संसर्ग नियंत्रणास्तव आपत्कालीन उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्यामुळे साथरोग अधिनियम, 1897 मधील खंड 2,3 व 4 ची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. याशिवाय जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. प्रत्येक उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय स्तरावर समिती नेमण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष संबंधित तालुक्याचे तहसीलदार हे राहणार असून गटविकास अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, संबंधीत वैद्यकीय अधिकारी, तालुक्याचे ठाणेदार हे सदस्य आहेत. तालुका आरोग्य अधिकारी हे सदस्य सचिव असतील. सदरहू समितीने संपूर्ण तालुक्यात कोरोना व्हायरसची लागण झालेले संशयीत रूग्ण आढळून आल्यास त्या संदर्भात नियंत्रण, देखरेख ठेवून स्थानिक स्तरावर परिस्थिती हाताळायची आहे.
प्रतिबंधात्मक उपायोजना करण्याकरीता गठीत केलेल्या तालुकास्तरीय समितीशी समन्वय साधण्याकरीता जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी यवतमाळ, बाभुळगाव, आर्णी, राळेगाव, कळंब, केळापूर, झरीजामणी, घाटंजी, वणी, मारेगाव, पुसद, दारव्हा, नेर, दिग्रस, महागाव व उमरखेड या तालुक्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणुक केली आहे.
हे नियंत्रण अधिकारी तालुकास्तरीय समितीचा आढावा घेवून तालुक्यातील होम कॉरेंटाईन, इन्स्टीट्युशनल कॉरेंटाईन याची माहिती घेतील. तसेच विदेशातून प्रवास करून एखादी व्यक्ती जिल्ह्यात दाखल झाल्यास स्थानिक यंत्रणेमार्फत माहिती गोळा करून जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय व यवतमाळ येथील नियंत्रण कक्षास व प्रशासनास कळवतील. सोबतच संबंधित तालुक्यात वेळोवेळी दौरे करून परिस्थितीचा आढावा घेतील. याशिवाय कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी इतर अनुषंगिक महत्वाची कामेसुध्दा पार पाडण्याची जबाबदारी या समितीवर आहे.
सर्व नियंत्रण अधिकारी व सहनियंत्रण अधिकारी यांना कोरोना संदर्भात करावयाच्या कार्यवाहीकरीता आवश्यकतेनुसार त्यांच्या कार्यालयातील कर्मचा-यांची सेवा वापरण्याची मुभा देण्यात येत असल्याचेही जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी आदेशात नमुद केले आहे.
००००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी