कोरोना : सुचनांचे उल्लंघन होत असल्यास कडक धोरण अवलंबवा



             
v पालकमंत्र्यांचे यंत्रणेला निर्देश
यवतमाळ दि.20 : कोरोना विषाणूचे संकट संपूर्ण जगावर आले आहे. यात आपला देश, राज्य, जिल्हा आदी ढवळून निघाला आहे. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासन आणि प्रशासनामार्फत गांभिर्याने उपाययोजना करण्यात येत आहे. सर्व काही नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरू आहे. अशावेळी शासन आणि प्रशासनाकडून दिलेल्या सुचनांचे उल्लंघन होत असेल तर यंत्रणेने कडक धोरण अवलंबवावे, असे स्पष्ट निर्देश राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियोजन सभागृहात विविध विभागांचा आढावा घेतांना ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
विदेशातून तसेच रोजगारासाठी मुंबई, पुणे आदी ठिकाणी गेलेले नागरिक जिल्ह्यात परत येत आहे, त्यांची योग्य तपासणी करा, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, गाव व तालुका स्तरावरील यंत्रणेने अतिशय दक्ष राहणे गरजेचे आहे. होम कॉरेंटाईन केलेल्या लोकांना घराबाहेर फिरु देऊ नका. या विषाणूचा संसर्ग इतरांना न होण्यासाठी दक्षता घेण्यात येत आहे. तरीसुध्दा या सुचनांचे उल्लंघन होत असेल तर आपल्याला दिलेल्या कायदेशीर अधिकाराचा वापर करावा. आपल्याला काय होते, ही बाब नागरिकांनी मनातून काढून टाकावी. आपल्या आरोग्यासाठी प्रशासनाच्या सुचना गांभिर्याने घ्या. दारुची दुकाने, बियर शॉपी, पानठेले आदींबाबत कायद्याची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी सर्वांना आदेश देण्यात आले आहेत. काही तालुक्यांनी होम कॉरेंटाईनबाबत अधिक गांभिर्याने काम करणे गरजेचे आहे. नगर पालिका तसेच नगर पंचायत प्रशासनाने आपल्या हद्दीतील स्वच्छता अतिशय चांगली ठेवावी. सानिटायझर किंवा मास्कचा काळाबाजार होणार नाही, याबाबत अन्न व औषध प्रशासनाने अधिक लक्ष द्यावे. होम कॉरेंटाईनबाबत पोलिस विभागाने तालुका स्तरावर एक अधिकारी व चार पोलिस शिपायांचा समावेश असलेली समिती बनविलेली आहे. त्यांनी याबाबत इतर यंत्रणेच्या समन्वयातून कामे करावीत. तसेच ‘कोव्हीड – 19’ बाबत आलेल्या सर्व सुचनांचे यंत्रणेतील अधिका-यांनी योग्यप्रकारे वाचन करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या. यावेळी अधिष्ठाता, शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनीसुध्दा मार्गदर्शन केले.
  सादरीकरण निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी केले. बैठकीला जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, आरोग्य विभागाचे तालुका वैद्यकीय अधिकारी, तालुक्याचे ठाणेदार, तहसीलदार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : बैठकीत मार्गदर्शन करतांना पालकमंत्री संजय राठोड
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी