नागरिकांनो प्रशासनाच्या सुचनांचे गांभिर्याने पालन करा – पालकमंत्री





v घरात  बसूनही  कोरोनावर मात करणे शक्य
यवतमाळ दि.20 : कोरोना विषाणूचे संकट गंभीर आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे जनजीवन ठप्प झाले आहे. गर्दीची ठिकाणे टाळून घरात बसणे हा यावर उत्तम पर्याय असल्यामुळे घरात राहूनच आपण यावर विजय मिळवू शकतो. कोरोनाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेबाबत जिल्हा प्रशासन अतिशय चांगले काम करीत आहे. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे नागरिकांनी गांभिर्याने पालन करावे, असे आवाहन राज्याचे वने, भुकंप पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कोरोना संकटाचा सामना सर्वजण मिळून करू, असे सांगून श्री. राठोड म्हणाले, एकाच ठिकाणी नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा फायदा दिसत आहे. कोरोना संदर्भात शासनाकडून दररोज व्हीसीद्वारे आढावा घेण्यात येत असून जिल्हा प्रशासनाला सुचना केल्या जात आहेत. या सुचनांचे पालन करण्यासाठी प्रशासन कटिबध्द आहे. त्यामुळे नागरिकांनीही आपली जबाबदारी म्हणून शासन – प्रशासनाला सहकार्य करावे.
प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी आतापर्यंत जिल्हा प्रशासनाने एकूण 54 परिपत्रक काढले आहेत. यात नियंत्रणासाठी वरिष्ठ अधिका-यांना फिल्डवर पाठविणे, तालुकास्तरीय समितीची स्थापना, कॉरेंटाईन व आयसोलेशन कक्षाची स्थापना, यात्रा, महोत्सव, लग्न, मोठे कार्यक्रम रद्द करणे, सभा, उपोषण, सामाजिक व सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी, सर्व शॉपींग मॉल व गर्दीच्या ठिकाणावर बंदी, सर्व विभागप्रमुखांनी मुख्यालयी राहणे, 24 तास नियंत्रण कक्ष सुरु करणे, विदेशातून आलेल्या नागरिकांची शोधमोहीम राबविणे, पानपट्टी, जर्दाची दुकाने, बार ॲन्ड रेस्टॉरंट, मद्यविक्री दुकाने पुर्णपणे बंद ठेवणे, खानावळ, ढाबे, हॉटेल रात्री आठ वाजतानंतर बंद करणे आदी परिपत्रकांचा समावेश आहे. यानुसार सर्वांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनासोबत पोलिस विभाग, आरोग्य विभाग व इतर सर्व विभागाचा चांगला समन्वय आहे, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी पत्रकारांना माहिती देतांना जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, सध्या विलगीकरण कक्षात तीन जण असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. दुबई व मक्का (सौदी अरेबिया) वरून आलेल्या व विलगीकरण कक्षात असलेल्या दोघांना घरी जाण्यासाठी सुट्टी देण्यात आली आहे. मात्र ते इतरत्र फिरू नये म्हणून पुढचे 14 दिवस त्यांना होम कॉरेंटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात होम कॉरेंटाईनमध्ये असलेल्या नागरिकांना कोणतेही लक्षणे नाहीत. ते केवळ विदेशातून आलेल्या व्यक्तिंच्या संपर्कात आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना आरोग्य विभागाच्या निगराणीत घरीच ठेवण्यात आले आहे. कोरोना विषाणूची लक्षणे पॉझेटिव्ह आहे की नाही, हे फक्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता किंवा जिल्हा शल्य चिकित्सक जाहीर करू शकतात. त्यामुळे शहरी किंवा ग्रामीण भागात नमुने चाचणीबाबत कोणी अफवा पसरवित असेल तर अशा डॉक्टरांवर कारवाई केली जाईल. जिल्ह्यात साथरोग अधिनियम – 1897, आपत्ती व्यवस्थापन कायदा – 2005 व कलम 144 लागू करण्यात आले आहे. याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी एम.डी.सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : पत्रकार परिषदेत माहिती देतांना पालकमंत्री संजय राठोड
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी