जिल्हाधिका-यांच्या आवाहनावरून सानप कुटुंबियांतर्फे घरगुती पध्दतीने विवाहाचे आयोजन



v गर्दी टाळण्यासाठी इतरांनीही आदर्श घेण्याचे आवाहन
यवतमाळ दि.16 : सध्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे प्रशासनाने गर्दीचे कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम, आंदोलने आदींना जिल्हा प्रशासनाने बंदी घातली आहे. तसेच गर्दीचे ठिकाण टाळण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे. अशातच माजी नगरसेवक जयदीप माधवराव सानप, रा. वंजारी फैल, यवतमाळ यांचे कनिष्ठ बंधु ॲङ लक्ष्मीकांत सानप यांचा दि. 19 मार्च रोजी दीपलक्ष्मी मंगल कार्यालय येथे थाटामाटात विवाह समारंभ आयोजित करण्यात आला होता. कुटुंबियांकडून जवळपास 2500 लोकांना लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वाटण्यात आल्या. पाच हजार लोकांच्या उपस्थितीत भव्यदिव्य स्वरुपात या सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार होते.
ही बाब जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांच्या लक्षात येताच त्यांनी संबंधित कुटुंबियांची भेट घेतली. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभुमीवर त्यांना परिस्थितीचे गांभिर्य समजावून सांगितले. तसेच जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांच्याशी संबंधित कुटुंबियांची भेट घालून दिली. जिल्हाधिकारी आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी लग्न समारंभ मोठ्या स्वरुपात न करता केवळ दोन कुटुंबियांमध्ये आटोपता घ्यावा व गर्दी टाळावी, असे आवाहन केले. या आवाहनाला सानप कुटुंबियांनी सकारात्मक प्रतिसाद देत संपूर्ण लग्न समारंभ रद्द करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे आता केवळ वर आणि वधुकडील दोन कुटुंबियांच्या उपस्थितीत हा समारंभ होणार आहे. 
याबद्दल जिल्हाधिकारी यांनी सानप कुटुंबियांना कार्यालयात बोलावून त्यांचे अभिनंदन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे आदी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील इतरही नागरिकांनी सानप कुटुंबियांचा आदर्श घ्यावा. तसेच कोरोनाबाबत जिल्ह्यातील परिस्थिती लक्षात घेऊन मोठे समारंभ, धार्मिक उत्सव आदी बाबी टाळून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी