नागरिकांना विहित कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून द्या - आयुक्त डॉ.एन.रामबाबू

लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत विभागांचा आढावा राज्य लोकसेवा हक्क आयुक्त डॉ.एन.रामबाबु यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत सेवा देणाऱ्या जिल्हास्तरीय विभाग प्रमुखांची आढावा बैठक महसूल भवन येथे घेण्यात आली. नागरिकांना विविध शासकीय सेवा विहित कालमर्यादेत उपलब्ध करून द्या, अशा सूचना आयुक्तांनी बैठकीत केल्या. बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, आयोगाचे उपसचिव अनिल खंडागळे, अप्पर जिल्हाधिकारी समाधान गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा समन्वयक अधिकारी फिरोज पठाण व लोकसेवा देणारे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. आयुक्तांनी जिल्ह्यात लोकसेवा हक्क कायद्यांतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला. त्यानंतर प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना दिल्या. कायद्यातील तरतुदीप्रमाणे अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व विहित कालमर्यादेत नागरिकांना पुरविण्याबाबत सर्व विभागांना निर्देशित केले. संबंधित विभागांकडून पात्र नागरिकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांना वरीष्ठांकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते. त्यानंतरही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. याकरिता संबंधित विभागांनी कार्यालयात तरतुदीनुसार सूचना फलक लावण्याबाबत निर्देश दिले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत जिल्ह्यामध्ये शासकीय विभागांमार्फत नागरिकांना ५२९ सेवा पुरविल्या जातात. लोकसेवकांकडून अर्ज, प्रकरणे निकाली काढण्याचे प्रमाण हे किमान ९० टक्के असणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात विहित कालमर्यादेत सेवा पुरविण्याची गती वाढविणे आवश्यक असल्याचे लोकसेवा हक्क आयुक्तांनी सांगितले. जिल्ह्यातील कार्यालयांची तपासणी करण्यात येणार असून विहित कालमर्यादेत सेवा न देणाऱ्या लोकसेवकांवर आयोगाकडून कारवाई करण्यात येणार आहे. जे विभाग कालमर्यादेत सेवा उपलब्ध करून देतील, अशा अधिकाऱ्यांचा विभागस्तरावर सत्कार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 000 --

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी