यवतमाळात पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील संस्कृतीचे आदान प्रदान होण्यासाठी यवतमाळ येथे पाच दिवसीय 'महासंस्कृती महोत्सवाचे' आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव दि.१५ ते १९ फेब्रुवारी दरम्यान समता मैदानात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी गठित समित्यांनी सोपविलेली कामे उत्तमपणे पार पाडावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिले. महासंस्कृती महोत्सवाच्या अनुषंगाने गठित समिती प्रमुखांची आज जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांच्या अध्यक्षतेखाली महसूल भवनात आढावा बैठक झाली. या बैठकीला अप्पर पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक वैशाली रसाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, कार्यकारी अभियंता दादासाहेब मोखाडे, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर याच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवामध्ये घ्यावयाचे कार्यक्रम व उपक्रमाबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार या महोत्सवात सांस्कृतिक रंगमंचावरील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या कार्यक्रमात शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडा, भारुड, गोंधळगीत, लोककलांचे कार्यक्रम, विविध भागातील तसेच स्थानिक दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेल्या लोककला व संस्कृती यांचे कार्यक्रम होणार आहे तसेच कविता, व्याख्याने, देशभक्ती गीत, जिल्ह्यातील स्थानिक सण, उत्सव कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे. यासह प्रदर्शनिय दालने उभारण्यात येणार आहेत. यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर आधारित सचित्र दालन, राज्य संरक्षित स्मारके व गडकिल्ले यांची माहिती जनसामान्यापर्यंत पोहचविण्यासाठी कार्यक्रम, प्रदर्शन भरविणे, वस्त्र संस्कृती दालन, हस्तकला वस्तु दालन, बचत गटांचे उत्पादन दालन, पर्यटन विषयक दालन उभारण्यात येणार आहे. या महोत्सवात महाराष्ट्राची संस्कृती दर्शविणाऱ्या स्पर्धा, मर्दानी खेळ, शिवकालीन लोककला, लुप्त होत चाललेल्या खेळांसंबंधित उपक्रम राबविले जाणार आहेत. या महोत्सवातील कार्यक्रम नियोजनबद्ध करण्यासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. यात निविदा प्रक्रिया, निमंत्रण, समन्वय अधिकारी, कायदा व सुव्यवस्था, मूलभूत सुविधा, प्रचार प्रसिद्धी, वैद्यकीय सेवा, विद्युत व्यवस्था, आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष, कार्यक्रमस्थळी तसेच रस्त्यावरील वाहतूक नियोजन व पार्किंग व्यवस्था, क्रीडा, सांस्कृतिक प्रकार व वेळापत्रक नियोजन आणि महासंस्कृती उपक्रम या कामांसाठी विभाग प्रमुखांच्या समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समितीला नेमून देण्यात आलेली कामे सुरळीत पार पाडण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी यावेळी दिले. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी