शासकीय योजना, महिला संरक्षण आणि नुकसान भरपाई योजनाविषयी कायदेविषयक शिबीर

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व तहसिल कार्यालय यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र व राज्य सरकारच्या योजना, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ आणि महाराष्ट्रात बळी पडलेल्यांना नुकसान भरपाई योजना" याबाबत तहसिल कार्यालयात कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरून आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता या शिबीराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल नहार हे होते. तर तहसिलदार ज्योती वसावे यांची प्रमुख उपस्थ‍िती होती. या कार्यकमाचे प्रमुख वक्ते म्हणुन नायब तहसिलदार एकनाथ बिजवे, पॅनल वकील अॅड निलिमा जोशी हे होते. कार्यक्रमाचे वक्ते एकनाथ बिजवे यांनी केंद्र आणि राज्य सरकार तर्फे चालणाऱ्या योजनांबाबत तसेच सरकारी कामात उशीर का होतो याबाबत सविस्तर माहिती दिली. अॅड निलिमा जोशी यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी कर्मचारी महिलांना राज्य घटनेने दिलेल्या अधिकारावर माहिती दिली. कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ याबाबतचा कायदा ९ डिसेंबर २०१३ रोजी अंमलात आणला गेला असल्याचे यावेळी सांगितले. महिला काम करत असलेल्‌या ठिकाणी त्यांच्या संरक्षणाकरीता एक समिती निर्माण झालेली असते. अशा ठिकाणी छळ झालेल्या महिलांना त्या समितीकडे ३ महिन्याच्या आत लेखी स्वरूपात तक्रार करता येते. तसेच महिलांनी खोटी तक्रार दिली तर त्याचा परिणाम देखील काय होतो याबाबत माहिती दिली तहसिलदार ज्योती वसावे यांनी कामाच्या ठिकांणी महिलांवर होणाऱ्या छळाबाबत सांगितले की, महिलांचा वावर आज प्रत्येक क्षेत्रात झालेला आहे. कायद्याबाबत महिलांमध्ये जागरूकता असणे गरजेचे आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणाल नहार यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तसेच प्रथमतः तहसीलमध्ये येणाऱ्या प्रत्येक लोकांना शासनाच्या प्रत्येक योजनेबाबत माहिती असणे गरजेचे असल्याचे यावेळी सांगितले. नागरीकांना शासकीय योजनांचा फायदा कसा घेता यावा यावर मार्गदर्शन दिले. तसेच जिल्हा विधी सेवेचे कार्य काय आहे व जिल्हा विधि सेवा कोण लोकांना मोफत सेवा पुरविते यावर सविस्तर अशी माहिती दिली. मध्यस्थी कशी करता येते व मनोधर्य योजनेबाबत विस्तृत माहिती दिली. विधि सेवेच्या योजनाची माहिती आपल्या गल्ली, मोहल्ल्यातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तहसिल कार्यालयाच्या दर्शना शिरभाते यांनी तर सिमा डोंगल यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमाकरीता मोठ्या संख्येने लोक व महिला कर्मचारी उपस्थ‍ित होते. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी