मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 13 ऑक्टोबरला शासन आपल्या दारी कार्यक्रम

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करावे - डॉ.पंकज आशिया
शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती आणि त्याचा लाभ शेतकरी, गोरगरीब व गरजू नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येणारा शासन आपल्या दारी अभियानाचा कार्यक्रम दि.13 ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथे आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी दिल्या. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या नियोजनासाठी विविध समित्या गठित करण्यात आल्या आहेत. या समित्यांच्या कामकाजाचा आज जिल्हाधिकारी डॉ.आशिया आणि मुख्यमंत्री कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी राहुल देशपांडे यांनी आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात झालेल्या या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमात लाभार्थ्यांना शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी प्रशासकीय यंत्रणांनी कार्यवाही सुरू केली आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांना ने-आण करण्यासाठी एसटी महामंडाळाच्या बसेस उपलब्ध कराव्यात. या बसेसमध्ये येणाऱ्या लाभार्थ्यांना स्थानिक स्तरावर अल्पोपाहार, पिण्याच्या पाण्याची सूविधा आणि त्यांची आरोग्य तपासणी करावी. कार्यक्रमाच्या ठिकाणी लाभार्थ्यांसाठी जेवणाची व्यवस्था तसेच आरोग्य तपासणी, उपचार आणि इतर आरोग्य सुविधासाठी केंद्र उभारावे. विविध शासकीय योजनांची माहिती देणारे फलक, स्टॉल, मुख्यमंत्र्यांना देण्यात येणारे निवेदन स्विकारण्यासाठी जनकल्याण कक्ष उभारावे. कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांसाठी वाहनतळ निर्माण करुन वाहतुककोंडी होणार नाही याची काळजी घ्यावी. लाभार्थ्यांना ओळखपत्र आणि सुरक्षा पासेस देणे, एक अतिदक्षता कक्ष सुसज्ज ठेवणे, कार्यक्रमाच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी कचऱ्याचे नियोजन करणे आदी महत्त्वपूर्ण सूचना जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी दिल्या. बैठकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी राहुल देशपांडे यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा घेऊन महत्त्वपूर्ण सूचना केल्या. कार्यक्रमाच्या आयोजनातील बारकावे, करावयाची कारवाई व यापूर्वी ज्या जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम झाले, तेथील अनूभव सांगितले. प्रास्ताविकात निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी या कार्यक्रमाची व प्रत्येक विभागाने करावयाच्या कार्यवाहीची माहिती दिली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी