जिल्हाधिकाऱ्यांची स्त्री रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयास भेट व पाहणी

रुग्णसेवा व स्वच्छतेचा घेतला आढावा : वार्डांची पाहणी, रुग्णांशी साधला संवाद
जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच स्त्री रुग्णालयास भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आरोग्य यंत्रणेची पाहणी केली. रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधीसाठा, रुग्णांना उत्तम दर्जाच्या सुविधा देण्यासोबतच रुग्णालयीन सेवा, सुविधेच्या उपलब्धतेबाबत त्यांनी आरोग्य प्रशासनास निर्देश दिले. स्त्री रुग्णालयात भेटी प्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सुखदेव राठोड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॅा.मनोज तगडपल्लेवार, रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॅा.रवी पाटील उपस्थित होते. स्त्री रुग्णालयात भेटी प्रसंगी प्रसुतीगृह, वार्ड, शस्त्रक्रीयागृहाची त्यांनी पाहणी केली. रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर लवकरात लवकर सुरु करण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर जिल्हाधिकारी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पोहोचले. यावेळी प्रभारी अधिष्ठाता डॅा.आनंद आशिया, मेडीसिन विभाग प्रमुख डॅा.बाबा येलके, बालरोग विभाग प्रमुख डॅा.अजय केशवाणी, स्त्रीरोग विभागाचे डॉ. वऱ्हाडे, डॅा.अजय कुसुंबिवाल यांच्यासह विविध विभागाचे डॅाक्टर्स उपस्थित होते.
वैद्यकीय महाविद्यालयात त्यांनी रुग्णसेवा व स्वच्छतेचा सविस्तर आढावा घेतला. विशेष म्हणजे महाविद्यालयातील बालके व महिलांच्या वार्डांसह सर्वच वार्डांची त्यांनी पाहणी केली. वार्डातील स्वच्छता, रुग्णांना दिल्या जात असलेल्या सुविधांची पाहणी केली तसेच रुग्णांशी संवाद देखील साधला. महाविद्यालयातील औषधीसाठा, अत्यावश्यक यंत्रसामुग्रीची देखील पाहणी केली व सुचना केल्या. रुग्णालयामध्ये औषधांचा तुटवडा भासणार नाही, याची काळजी घ्या. रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजे. रुग्णांची गैरसोय होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. स्त्री रुग्णालयातील अडीअडचणी व समस्यांची देखील त्यांनी माहिती घेतली. अत्यावश्यक सर्व सुविधा उपलब्ध असल्या पाहिजे, असे ते म्हणाले. बालमृत्यू दर पुर्वी 4.6 टक्के इतका होता आता तो 3.7 टक्के इतका खाली आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. औषधे खरेदीच्या प्रस्तावांना मान्यता जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीतून रुग्णालयांना आवश्यक असलेल्या औषधे खरेदीसाठी निधी दिला जातो. जिल्हा, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयातील औषधींसाठी जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी जिल्हा आरोग्य अधिकारी व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आवश्यक औषधे खरेदीसाठी महाविद्यालयाला निधी निधी दिला जातो. या तिनही संस्थांच्या औषधे खरेदीच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी सांगितले. जिल्ह्यात कुठेही औषधांची कमतरता नसल्याचे ते म्हणाले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी