पाळोदी येथे पुसद प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात

प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, पुसद अंतर्गत 18 ते 20 ऑक्टोबर या दरम्यान प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा स्पर्धेचे मोठ्या उत्साहात आर्णी तालुक्यातील पाळोदी येथे शासकीय आश्रमशाळा येथे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सतीश सपकाळ होते तर प्रमुख उपस्थिती सहाय्यक प्रकल्प अधिकारी केशव शेगोकार, सहायक लेखाधिकारी विष्णु चव्हाण, अरुण चव्हाण, शिक्षण विस्तार अधिकारी सुनिल लोणीकर, चटलेवाड, वंदना वानखडे, मुख्याध्यापक श्री. एस. राठोड, हजारे, श्याम चव्हाण, गावातील प्रथम नागरिक सरपंच कांताताई कुमरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संजय मडावी मंचावर उपस्थित होते. यावेळी क्रांतिविर बिरसा मुंडा व आदिवासी क्रांतिकारकांचे प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर मशाल प्रज्वलित करून सुपूर्द करण्यात आली. यावेळी उपस्थित खेळाडू व पंचांना शपथ देण्यात आली. उद्घाटनाप्रसंगी प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे म्हणाले, पाळोदी येथे शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळा मोठ्या प्रयत्नाने पुनर्जीवित करण्यात आली व त्याची सुंदर परिणीती म्हणून आज प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे सामने होत आहेत याचा आनंद आहे, असे उद्गार त्यांनी काढले. या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये पुसद प्रकल्पातील पुसद, दिग्रस, दारव्हा, उमरखेड, महागाव, आर्णी व नेर या सात तालुक्यांमधील 7 शासकीय व 12 अनुदानित आश्रमशाळेतील एकूण 424 मुले व 373 मुली असे एकूण 797 (हर्षी व वसंतपूर केंद्र) खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पाळोदी शाळेचा परिसर, शैक्षणिक वातावरण, खेळाच्या नियोजनाचे कौतुक करण्यात आले. भोजन व्यवस्थाही चांगली होती. या उपक्रमासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याध्यापक सतीश सपकाळ यांनी सांगितले. या क्रीडा स्पर्धेतील विजयी खेळाडूंना आणि विजेता संघाला विजयी चषक व पदक देऊन गौरविण्यात आले. हर्षी केंद्र या प्रकल्पस्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक घेवून अव्वल ठरले. यावेळी एकूण 350 विद्यार्थ्यांची विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे अधीक्षक क्षीरसागर, अधिक्षिका सुवर्णा इंगोले, शाळेचे सर्व कर्मचारी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक प्रकल्प अधिकारी केशव शेगोकार यांनी केले. तर सूत्रसंचालन समाधान जाधव व नारायण राऊत यांनी केले. आभार शाळेचे अधीक्षक क्षीरसागर यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी