‘शासन आपल्या दारी’ची कामे प्राधान्याने पूर्ण करा - डॅा. पंकज आशिया

> जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पूर्व तयारीचा आढावा > ३० ऑक्टोबरला किन्ही येथे होणार भव्य कार्यक्रम ; यवतमाळ -जिल्ह्यात शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत ३० ॲाक्टोबर रोजी किन्ही येथे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम होणार आहे. त्यापूर्वी कार्यक्रमासंबंधित सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांनी संबंधित अधिकारी यांना दिले.
जिल्हाधिकारी डॅा.आशिया यांनी महसूल भवनात कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला. या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॅा.पवन बन्सोड, अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, अधीक्षक अभियंता संभाजी धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, जिल्हा नियोजन अधिकारी मुरलीधर वाडेकर, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॅा. शिरीष नाईक, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॅा. गिरीश जतकर आदी विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॅा.आशिया यांनी सुरुवातीला कार्यक्रमाच्या अनुषंगाने निविदा प्रक्रियांची माहिती घेवून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश दिले. ऑनग्राऊंड तयारी पूर्ण झाली पाहिजेत, जिल्हाभरातून येणाऱ्या लाभार्थ्यांच्या वाहतुकीसाठी सहाशेहून अधिक बसेसची आवश्यकता असून त्याप्रमाणे नियोजन करावे. लाभार्थ्यांची भोजनाची व्यवस्था, आरोग्य केंद्र, वाहनतळ, वैद्यकीय सेवा, वाहतूक नियंत्रण, आपत्ती व्यवस्थापन, विविध विभागाचे स्टॅाल, कायदा व सुरक्षा, विद्युत पुरवठा, स्वच्छता आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था, निवेदनांसाठी स्वतंत्र दालन आदी कामांचा आढावा जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांनी गठीत केलेल्या समित्यांच्या प्रमुखांकडून घेतला. यावेळी शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासकीय पातळीवरील कामे पूर्ण झाली पाहिजेत. दि. २७ ऑक्टोबर रोजी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री संजय राठोड प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. त्यापूर्वी सर्व कामे प्राधान्याने पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांनी दिले. शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यवाही सुरु केली आहे. विविध कामांच्या निविदा प्रक्रिया सुरु असून विविध कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूक्ष्म नियोजन केले जात असल्याचे विविध विभागाच्या प्रमुखांनी यावेळी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी