दिव्यांगांसाठी डिसेंबरपर्यंत धोरण आणणार - आ.बच्चू कडू

> दिव्यांगासाठी स्वतंत्र घरकूल योजनेसाठी प्रयत्न करणार ; > दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानात ७ हजार दिव्यांगांचा सहभाग ; > दिव्यांगांशी साधला संवाद ;
दिव्यांगांसाठी डिसेंबरपर्यंत धोरण आणणार असल्याचे दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाचे अध्यक्ष तथा आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी सांगितले. दिव्यांग विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानांतर्गत लोहारा येथे आयोजित दिव्यांग मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याला जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष, पोलिस अधीक्षक डॉ.पवन बन्सोड, समाज कल्याणचे प्रादेशिक उपायुक्त सुनील वारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, सहाय्यक आयुक्त भाऊराव चव्हाण, समाजकल्याण अधिकारी पियूष चव्हाण आदी उपस्थित होते. जिल्ह्याच्या विविध भागातील सुमारे सात हजाराहून अधिक दिव्यांग बांधव या मेळाव्यात सहभागी झाले होते. या सहभागी दिव्यांग बांधवांशी आ.कडू यांनी संवाद साधला.
शासकीय यंत्रणेने दिव्यांगांच्या वेदना, दुःख जाणून त्यांच्या दारी जावून काम करणे गरजेचे आहे. शासनाने स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय सुरु केले आहे. असे असले तरी योजनांचा लाभ दिव्यांगांपर्यंत पोहोचविण्यासाठी एकत्रित आणि निःस्वार्थपणे काम करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनानेही दिव्यांगांच्या दारी गेले पाहिजेत, असे पुढे बोलतांना आ.कडू यांनी सांगितले. दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकूल योजना सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. दिव्यांगांच्या अर्थसहाय्यासाठी राज्य शासनाने २५० कोटींची तरतूद केली असून लवकरच पैसे खात्यात जमा होणार असल्याची माहिती श्री.कडू यांनी बोलतांना दिली. भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिव्यांगासाठी घेतलेल्या निर्णयाबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.
मेळाव्याला संबोधित करतांना जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया म्हणाले, दिव्यांग बांधवांसाठी राज्य शासनाने स्वतंत्र विभाग सुरु केला असून त्यामाध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत. दिव्यांगांना योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील दिव्यांगांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्व्हे केला जात आहे. दिव्यांगांची डिजिटल नोंदणी करण्यात येत आहे. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांनी प्रास्ताविक केले. सार्वत्रिक जनगणनेनुसार राज्यात दिव्यांगांची संख्या २९ लाख ६३ हजार असून जिल्ह्यात २१ हजार इतकी निश्चित करण्यात आली आहे. समाज कल्याण विभागामार्फत दिव्यांग उन्नती पोर्टल सुरु आहे. दिव्यांगांचे सर्वेक्षण केले जात आहे. पाच टक्के सेस खर्च करण्यात अमरावती विभागात यवतमाळ जिल्हा परिषद पहिल्या क्रमांकावर आहे. दिव्यांगांच्या सुविधेसाठी पहिला डिजीटल दिव्यांग कक्ष सुरु करण्यात येत असल्याचे डॉ.घोष यांनी सांगितले.
यावेळी आमदार बच्चू कडू यांच्याहस्ते जिल्हा कौशल्य, रोजगार मार्गदर्शन केंद्रामार्फत दिव्यांग लाभार्थ्यांना रोजगार कार्ड, स्टेट बॅंकेमार्फत एमआर किटचे वाटप, व्हिल चेअर, सीपी चेअर, सुगम छडी, दिव्यांग वित्त विकास महामंडळामार्फत धनादेश यासह विविध योजनांचे लाभ वितरीत करण्यात आले. या मेळाव्यात विविध विभागांचे स्टॅाल लावण्यात आले होते. या स्टॅाल्सच्या माध्यमातून दिव्यांगांना विविध योजनांची माहिती देवून त्यांची नोंदणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास राऊत तर आभार प्रदर्शन जिल्हा समाज कल्याण अधिकारी पीयुष चव्हाण यांनी केले. ००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी