2027 पर्यंत यवतमाळ जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्याचा संकल्प

जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचा पुढाकार : जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हा धोरणात्मक कृती आराखड्याचे विमोचन : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या धोरणनुसार वर्ष २०२७ पर्यंत शुन्य कुष्ठरोग संसर्ग हे उदिष्ट लक्षात ठेवुन कुष्ठरोगाचे निर्मूलन करण्याच्या दृष्टीने यवतमाळ जिल्हयाचा धोरणात्मक कृती आरखडा तयार करण्यात आला आहे. या कृती आराखड्याचे बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा मुख्य वनसंरक्षक धनंजय वायभासे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत, आरोग्य सेवा (कुष्ठरोग) सहाय्यक संचालक डॉ. गोपाळ पाटील हस्ते विमोचन करण्यात आले. याप्रसंगी यवतमाळ जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्याच्या दृष्टीने सर्वानी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी केले.
जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष, आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. सुनिता गोलाईत, सहाय्यक संचालक डॉ. आडकेकर, उपसंचालक डॉ. तरंगतुषार वारे यांच्या मार्गदर्शनाखाली व डॉ. गोपाळ पाटील यांच्या नियोजनाखाली 2027 पर्यंत यवतमाळ जिल्हा कुष्ठरोग मुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्यात येणार असून जिल्ह्यात कुष्ठरोगाबाबत प्रभावी आरोग्य शिक्षण देऊन कुष्ठरोगाबाबत जनजागृती करणे, सर्व स्तरावरील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका यांना प्रशिक्षीत करण्यात येणार आहे. तसेच गावनिहाय कुष्ठरोगाबाबत प्रभावी घरोघर सर्वेक्षण करुन निघालेल्या सर्व संशयीत कुष्ठरुग्णांची वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात येणार आहे. निदान झालेल्या रुग्णांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे, त्यांच्या सहवासीतांना कुष्ठरोग प्रतिबंधात्मक औषधोपचार देणे सुरु करणे, शोधलेल्या तसेच जिल्ह्यात जोखमी भागामध्ये कुष्ठरोगाबाबत विविध मोहीम घेण्यात येणार आहे.या मोहिमेत केंद्र सरकारच्या आयुष्मान भव उपक्रमाव्दारे सर्व शासकीय दवाखान्यात बाह्यरुग्ण विभागात येणाऱ्या नागरीकांची कुष्ठरोग विचारात घेऊन पूर्ण तपासणी करणे याप्रकारच्या कृती जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. या कृती आराखड्याच्या माध्यमातून जिल्हा कुष्ठरोगमुक्त करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे. कुष्ठरोग निर्मूलनाकरीता जिल्ह्यात प्रभावी नियोजन यवतमाळ जिल्हयात वर्ष 2022-23 मध्ये 675 कुष्ठरुग्ण शोधण्यात आले असून त्यांना औषधोपचार देण्यात आला असुन वर्ष 2027 पर्यंत कुष्ठरोगमुक्त जिल्हा करण्याचा मानस आरोग्य विभागाने घेतला आहे. जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पि. एस. चव्हाण, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. गोपाळ पाटील यांच्यासह विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कुष्ठरोग निर्मूलनाकरीता जिल्ह्यात प्रभावी नियोजन करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आलेली आहे. वर्ष २०२३- २४ मध्ये जिल्ह्यात कुष्ठरोग संशयीत असलेल्या सर्वांची तपासणी करून जास्तीत जास्त प्रथमावस्थेत कुष्ठरूग्ण शोधून त्यांना बहुविध औषधोपचाराखाली आणणे. कुष्ठरोग संसर्गाची साखळी खंडीत करुन कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्द‍िष्ट निर्धारीत काळात पूर्ण करण्याचा संकल्प जिल्ह्याच्या कुष्ठरोग विभागाने केला आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी