आरोग्य विभागाच्या वतीने जागतिक दृष्टीदीन साजरा

यवतमाळ दि. 16 (जिमाका) : अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रम, सामान्य रुग्णालय तसेच आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आयुर्वेदिक महाविद्यालयात जागतिक दृष्टीदिन साजरा करण्यात आला. राष्ट्रीय अंधत्व व दृष्टीक्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी जागतिक दृष्टीदिन साजरा करण्यात येतो. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड होते. प्रमुख पाहुणे म्हणून आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजीव मुंदाणे, जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डॉ. मनोज तगलपल्लेवार, आयुर्वेदिक महाविद्यालयाचे नेत्र विभाग प्रमुख डॉ.वाघ, नेत्रतज्ञ डॉ. स्मिता चव्हाण, डॉ. आकाश भोजणे उपस्थित होते. यावर्षी लव्ह युवर आईज म्हणजे प्रेमाने घेऊया आपल्या डोळ्यांची काळजी हे घोष वाक्य निश्चित करण्यात आले आहे. कार्यक्रमामध्ये नेत्रदान पंधरवडानिमित्त वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे महात्मा जोतिबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्कच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदान श्रेष्ठदान या विषयावर पथनाट्य सादर केले. या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. डॉ.आकाश भोजणे यांनी जागतिक दृष्टी दिनाचा इतिहास सांगून डोळ्यांची काळजी, निगा सोबतच आरोग्याची काळजी कशी घ्यावी, याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.राजीव मुंदाणे यांनी वेळोवेळी नेत्रतज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करावी याविषयी मार्गदर्शन केले. डॉ.सुखदेव राठोड यांनी डोळ्यांना होणारे वेगवेगळे आजार व त्यावर उपाययोजना कशी करावी यावर मार्गदर्शन केले. निसर्गाची अदभूत किमया अंधांनाही पाहता यावी यासाठी मानवतेच्या दृष्टीकोनातून आपल्या मृत्युनंतर आपले नेत्रदान व अवयवदान करण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी https://notto.abdm.gov.in/pledge-registry या लींकवर अवदानाचे अर्ज भरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन नेत्रदान समुपदेशक सोनाली घायवान यांनी केले. 0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी