डेंग्यू आजार नियंत्रणासाठी जिल्ह्यात गावोगावी धुर फवारणी * डेंग्यूच्या उच्चाटनासाठी आरोग्य विभाग सज्ज * नागरिकांनी सुचनांचे पालन करण्याचे आवाहन

यवतमाळ दि. 13 (जिमाका) : पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू व इतर किटकजन्य आजारात वाढ होत असते. जिल्ह्यात मधल्या काळात अतिवृष्टी झाल्याने बहूतेक भागात जुलै ते सप्टेंबर या कालावधीत अशा आजारात वाढ आढळून आली आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी विविध उपक्रम राबविल्या जात आहे. डासांची मादी किटकजन्य आजार प्रसारास कारणीभुत ठरते. हे डास पाण्यामध्ये अंडी घालतात. त्यांच्या जीवनचक्राच्या चार अवस्था असतात. अंडी, अळी, कोष व पुर्णावस्थेतील डास. जानेवारी ते ११ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यात २४३ डेंग्यू निश्चीत रुग्ण आढळून आले आहेत. या वर्षांमध्ये डेंग्यू रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. डेंग्यू आजाराचा प्रसार हा एडीस या डासांच्या चावण्यापासून होतो तसेच या डासाची उत्पत्ती साठवणूक केलेल्या स्वच्छ पाण्यातच होत असते. या डासाच्या पाय व शरीरावर पांढरे पट्टे असतात. हा साधारणतः दिवसा चावतो व घरातील अंधाऱ्या भागात आढळुन येतो. डेंग्यू आजाराला प्रतिबंध करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. नागरिकांनी घरातील पाणी साठवणूकीचे भांडे आठवडयातून एकदा रिकामे व कोरडे करून कोरडा दिवस पाळावा, घराच्या आजुबाजूचा परिसर स्वच्छ राहिल याची काळजी घ्यावी, घराजवळ असलेले डास उत्पत्तीस्थाने नष्ट करावे, घरासमोरील नाल्या वाहत्या कराव्या, नष्ट करता न येणाऱ्या मोठ्या डासोत्पत्ती स्थानांमध्ये गप्पी मासे सोडण्यात यावे. अंगभर कपडे घालावेत, झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, डास पळवून लावणाऱ्या क्रीम ऑईलचा वापर करावा, जेणेकरून डासोत्पत्तीला व आजार प्रसाराला प्रतिबंध होईल व डेंग्यू आजार टाळता येईल. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत किटकजन्य आजार नियंत्रणासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामध्ये प्रत्येक घरी आरोग्य कर्मचारी व आशा स्वंयसेविकांद्वारे डासअळी आढळून आलेल्या भांड्यामध्ये टेमीफॉस कार्यवाही तसेच जलद ताप सर्व्हेक्षण तापाच्या रुग्णांचे रक्त नमुणे व संशयित डेंगू ताप रुग्णांचे रक्त जल नमुणे घेवून शासकिय महाविद्यालयात डेंग्यू तपासणीसाठी पाठविण्यात येत आहे. डास मारण्याकरीता गावे व शहरांमध्ये धुर फवारणी करण्यात येत आहे. डास उत्पत्ती स्थानात डासअळी भक्षक गप्पी मासे सोडण्यात येत आहे. जिल्ह्यातील खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व प्रयोगशाळेत डेंग्यू दूषित रुग्ण आढळून आल्यास त्याची सूचना त्वरित संबंधित जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयात देण्यात यावी, असे आवाहन खाजगी रुग्णालयांना करण्यात आले आहे. डेंग्यू या आजाराच्या निश्चित निदानासाठी फक्त एलायझा टेस्ट शासनमान्य असून शासकिय वैद्यकीय महाविद्यालयात यासाठी सेंटीनल सेंटर कार्यान्वित केलेले आहे. खाजगी वैद्यकिय व्यावसायिकांनी आपल्या रुग्णालयांमध्ये डेंग्यू रॅपिड टेस्टद्वारे डेंग्यू दूषित आढळून आलेल्या रुग्णाचे रक्तजल नमुने निश्चित निदानासाठी संबंधित जिल्हा हिवताप अधिकारी यांच्यामार्फत सेंटीनल सेंटर येथे पाठविण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.टी.ए.शेख यांनी केले आहे. जिल्ह्यात डेंगूने मृत्यु झाल्याचे वृत्त प्रकाशित होत आहे. परंतू बहूतांश मृत्यु हे सिकलसेल, अँनेमिया, निमोनिया, इंन्फुयूंझा, कुपोषण, फुप्फुसाचे गंभीर आजार तसेच विषाणुजन्य आजाराने झाल्याचे पडताळणीतून निदर्शनास आले आहे. नागरिकांनी खबरदारी म्हणून प्रशासनाच्या उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी