पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना गावस्तरावरील लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा - प्रमोदसिंह दुबे

केंद्र शासनाची पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना गावस्तरावरील जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या योजनेची पहिली सभा शुक्रवारी अपर जिल्हाधिकारी श्री. दुबे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बि एम राठोड यांनी सदस्य सचिव म्हणून सभेचे कामकाज पाहिले. या योजनेचे सादरीकरण एमएसएमई नागपूरचे सहायक संचालक पि टी डोईफोडे यांनी केले. या सभेस जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक श्रीनिवास चव्हाण, जिल्हा अग्रणी बॅंक प्रबंधक कार्यालयाचे निशिकांत ठाकरे, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे विशाल मनवर, सिएससी सेंटरचे जिल्हा समन्वयक मुकुंद ठाकरे उपस्थित होते. सभेचे अध्यक्ष अपर जिल्हाधिकारी प्रमोदसिंग दुबे म्हणाले की, पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजना ही अत्यंत चांगली योजना असून पारंपरिक उद्योजकांचा विकास साधण्यासाठी ग्रामसेवक व सरपंचांनी ऑनलाईन पद्धतीने प्रथम ग्रामपंचायतांची नोंदणी करून घ्यावी. तसेच योजनेचा गावपातळीवर जनजागृती करून ही योजना जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावी, असे निर्देश त्यांनी दिले. या योजनेच्या लाभासाठी पात्र लाभार्थांनी सामुहिक सुविधा केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या. यावेळी पंतप्रधान विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेचा जास्तीत जास्त होतकरू इच्छूक कारागीरांनी लाभ घेण्याचे आव्हान जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी बि एम राठोड यवतमाळ यांनी केले. या सभेच्या शेवटी खादी व ग्रामोद्योग मंडळाचे राजू तायडे यांनी आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी