बाधित शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी करण्याचे आवाहन

यवतमाळ दि. 16 (जिमाका) : अवकाळी पाऊस, अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तत्काळ मदत उपलब्ध व्हावी याकरिता शासन स्तरावरून ई-पंचनामा पोर्टल तयार करण्यात आले आहे. पोर्टलवर ई-पंचनामा केलेल्या काही शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण व ई-केवायसी केलेली नाही. शेतकऱ्यांनी ती तातडीने करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मार्च, एप्रिल, मे 2023 मध्ये अवकाळी पाऊस, ऑक्टोंबर 2021 चा मान्सून व सप्टेंबर, ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीची मदत बाधित शेतकऱ्यांना तत्काळ मिळावी याकरिता ई-पंचनामा पोर्टलवर तालुकास्तरावरून आतापर्यंत 73 हजार 910 बाधित शेतकऱ्यांची यादी अपलोड करण्यात आली आहे. जिल्हास्तरावरून 71 हजार 15 नोंदी मान्य करण्यात आलेल्या आहे. चुकीचे बँक खाते, आयएफएसकोड यामुळे 11 हजार 471 नोंदी रिजेक्ट झाल्या असून तालुकास्तरावरून दुरुस्ती करून अपलोड करण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत शासनस्तरावरून डीबीटी पद्धतीद्वारे 35 हजार 371 बाधित शेतकऱ्यांच्या खात्यात 23 कोटी 21 लाख 67 हजार 613 इतका निधी जमा करण्यात आलेला आहे. अजूनही 35 हजार 644 बाधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी केली नसल्यामुळे त्यांच्या खात्यात मदत निधी शासन स्तरावरून वितरीत करण्यात अडचण येत आहे. तालुका कार्यालयातून व्हीके नंबर प्राप्त करून बाधित शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी करावे. त्यानंतरच शासनस्तरावरून मदत थेट खात्यात जमा होणार आहे, असे जिल्हा प्रशासनावतीने कळविण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी