तुरीच्या शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचे व्यवस्थापन करावे कृषि विद्यापीठाच्या कीटकशास्त्र विभागाचे आवाहन

यवतमाळ, दि. १७ (जिमाका): नुकत्याच कीटकशास्त्रज्ञांनी केलेल्या वाशिम, अकोला व बुलढाणा जिल्ह्यातील सर्वेक्षणानुसार येत्या पंधरवाड्यात तूर पिक काही ठिकाणी फुलोऱ्यावर येईल. शेतकऱ्यांना तूर पिकापासून चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, मागील आठवड्यातील असणारे रात्रीचे थंड हवामान तूर पिकावरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या वाढीस पोषक असून अशा वातावरणामुळे तूर पिकाला शेंगा पोखरणाऱ्या अळ्यापासून नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी तूर पिकाची पाहणी करून वेळीच व्यवस्थापनाचे उपाय करण्याचे आवाहन डॅा. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोलाच्या कीटकशास्त्र विभागाने केले आहे. शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमध्ये शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोवर्पा) या किडीची मादी पतंग तुरीच्या कळ्या, फुले व शेंगा यावर अंडी घालते. अंड्यातून निघालेल्या अळ्या तुरीच्या कळ्या आणि फुले खाऊन नुकसान करतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मिमी लांब, विविध रंग छटेत दिसून येते जसे पोपटी, फिक्कट गुलाबी व करड्या रंगाची असून तिच्या पाठीवर तुटक करड्या रेषा असतात. मोठ्या अळ्या शेंगांना छिद्र करून आतील दाणे पोखरून खातात. पिसारी पतंग या पतंगाची अळी १२.५ मिमी लांब हिरवट तपकिरी रंगाची असते. तिच्या अंगावर सुक्ष्म काटे व केस असतात. अळी शेंगावरील साल खरडून छिद्र करते. व बाहेर राहून दाने पोखरते. शेंगे माशीची अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो. ही अळी शेंगाच्या आत राहून शेंगातील दाने अर्धवट कुरतडून खाते व त्यामुळे दाण्याची मुकनी होते. एकात्मिक व्यवस्थापन करतांना या तिनही किडी कळ्या, फुले व शेंगावर आक्रमण करीत असल्यामुळे त्यांच्या व्यवस्थापनासाठी जवळ जवळ सारखेच उपाय योजावे लागतात. त्यानुसार प्रति हेक्टर २० पक्षीथांबे शेतात उभारावेत. त्यामुळे पक्षी किडींच्या अळया खाऊन फस्त करतात. ५० टक्के फुलोरावर असतांना पहिली फवारणी करतांना निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अझाडिरेक्टीन ३०० पीपीएम ५० मिली किंवा अझाडिरेक्टीन १५०० पीपीएम २५ मिली किंवा एचएएनपिव्ही ५०० एलई प्रति हेक्टर किंवा बॉसिलस थुरिंनजिएंसिस १५ मिली किंवा क्विनॉलफॉस २५ ईसी, २० मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पहिल्या फवारणीनंतर १५ दिवसांनी दुसरी फवारणी करतांना इमामेक्टीन बेझोएट ५ एसजी ३ ग्रॅम किंवा लॅब्डा सायहॅलोमेथ्रीन ५ टक्के प्रवाही १० मिली किंवा ईथिऑन ५० टक्के ईसी २५ मिली किंवा क्लोरॅनट्रॅनीलिप्रोल १८.५ टक्के एससी प्रवाही २.५ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर असल्यास तुरीच्या झाडाखाली पोते टाकुन झाड हलवावे. त्यामुळे झाडावरील अळ्या पोत्यावर पडतील त्या गोळा करून नष्ट कराव्यात, असे कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॅा. डी.बी. उंदीरवाडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. 000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी