भारतीय सैन्यातील योद्धांच्या शौर्यगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी - निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत

शौर्य दिवस उत्साहात साजरा भारतीय सैन्यातील महान योद्धे आणि त्यांची कामगिरी समजण्यासाठी तरुणांनी शौर्यगाथांचे वाचन केले पाहिजेत. या शौर्यगाथा तरुणांसाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन निवासी उपजिल्हाधिकारी प्रकाश राऊत यांनी केले.
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयातील बळीराजा चेतना भवन येथे शौर्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात श्री.राऊत बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी सैनिक विनोद आरेवार आणि मदन रबडी उपस्थित होते. भारतीय सैन्याची कामगिरी तरुणांपर्यंत पोहोचली पाहिजेत. शौर्यगाथा समजून घेण्यासाठी तरुणांनी ‘महाराष्ट्राचे महारथी’ यासारख्या पुस्तकाचेही वाचन केले पाहिजे. मोबाईल, संगणक व टिव्हीबरोबर वाचन संस्कृती जतन करणे गरजेचे आहे, असे श्री. राऊत यांनी सांगितले. भारतीय सैनिकांनी २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाकिस्तानच्या सिमेमध्ये घुसून यशस्वीपणे सर्जिकल स्ट्राईक करुन आतंकवादी तळांना जमिनदोस्त केले होते. भारतीय सैन्याच्या या अतुलनीय शौर्य कामगिरीची नोंद परकीय राष्ट्रांनासुद्धा घ्यावी लागली होती. या गौरवशाली योद्धांची शौर्य गाथा विद्यार्थी आणि जनमानसात पोहोचवण्याच्या उद्देशाने २९ सप्टेंबर रोजी शौर्य दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो, असे बालाजी शेंडगे यांनी प्रास्ताविकात सांगितले. याप्रसंगी माजी सैनिक पुनर्नियुक्त संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष विवेक पांडे यांनी भारतीय सैन्याच्या गौरवशाली परंपरेची माहिती दिली. कार्यक्रमास वीरनारी मंगला सोनोने, नंदाबाई पुरम, स्नेहा कुळमेथे, सत्वशीला काळे, श्रीमती तायडे, वीरमाता लक्ष्मीबाई थोरात तसेच जिल्ह्यातील माजी सैनिक, अवलंबित व शालेय विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बालाजी शेंडगे यांनी तर सूत्रसंचालन यशवंत देशमुख यांनी केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत गायन व जयघोषाने करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी