जिल्ह्यात 46 मॉडेल स्कुलची निर्मिती होणार पालकमंत्री संजय राठोड यांची संकल्पना > जिल्हा परिषद शाळांचा होणार कायापालट > जिल्हा खनिकर्म योजनेतून 40 कोटी 80 लाखांचा निधी

यवतमाळ, दि.13 (जिमाका) : जिल्ह्यामध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी शिक्षण चेतना या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्हा परिषदेच्या 46 मॉडेल स्कुलची निर्मिती करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. पालकमंत्री श्री.राठोड यांच्या संकल्पनेतून हा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला असून त्याबाबत विविध कार्यक्रमात त्यांनी जाहीर केले आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळांचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील ज्या प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शंभरपेक्षा जास्त पटसंख्या आहे. त्या शाळांचा जिर्णोद्धार करणे, नवीन इमारत बांधणे, शाळांमध्ये शौचालय, चांगल्या वर्गखोल्या, प्रयोगशाळा, भौतिक व अत्याधुनिक सोयीसुविधा, स्मार्ट आणि डिजिटल शाळा करण्यासाठी निर्णय घेतला आहे. सध्याचे युग हे विज्ञानाचे युग आहे. नवी पिढी सक्षम झाली पाहिजेत, यासाठी जिल्हा परिषद शाळांचा विकास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. स्मार्ट अंगणवाडी करण्यासाठी नवनवीन उपक्रम सुरु आहेत. मॉडेल स्कुलची निर्मिती करण्यासाठी जिल्हा खनिकर्म योजनेतून 40 कोटी 80 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आला आहे. या मॉडेल स्कुलमध्ये डेस्क, बेंच, आनंददायी पध्दतीने अध्ययन व अध्यापन प्रकिया होण्यासाठी अत्याधुनिक व भौतिक सुविधायुक्त अशा 46 मॉडेल स्कुलची निर्मिती प्रायोगिक तत्वावर केली जाणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती नेमली आहे. या समितीच्या शिफारशीने शाळांची निवड करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी