दिल्लीतील अमृतवाटिकेसाठी जाणार यवतमाळची माती

अमृत कलश यात्रा आज निघणार : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत दिल्ली येथे साकारण्यात येणाऱ्या अमृतवाटिकेत यवतमाळ जिल्ह्याची माती एकरुप होणार आहे. यासाठी आज 25 ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय अमृत कलश यात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर ही यात्रा दिल्लीसाठी रवाना होणार आहे.
या अमृत कलश यात्रेच्या अनुषंगाने राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव विकास खारगे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी डॅा. पंकज आशिया यांच्यासह जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. मैनाक घोष, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर आभाळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अनिल ठेंगे, जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम, जिल्हा परिषद प्रशासन आणि नेहरू युवा केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित होते. ही अमृत कलश यात्रा 25 ऑक्टोबर रोजी सकाळी शहरात निघणार आहे. त्यानंतर जिल्हा परिषद येथून दुपारी विशेष ट्रॅव्हल्सने मुंबईला रवाना होणार आहेत. 27 ऑक्टोबर रोजी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत अमृत कलशाचे पुजन आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संपूर्ण राज्यातून येणाऱ्या प्रतिनिधींसाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमानंतर ही विशेष ट्रेन दिल्लीसाठी रवाना होणार आहे. या अमृत कलश यात्रेत यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत 16 पंचायत समित्यांचे 16 आणि सर्व नगरपरिषदांचा एक असे एकूण 17 अमृत कलश दिल्लीतील अमृतवाटिकेसाठी पाठविण्यात येणार आहे. या प्रत्येक कलशासाठी दोन असे 34 युवकयुवती, स्वयंसेवकांना नेहरु युवा केंद्राने प्रतिनिधी म्हणून प्राधिकृत केले आहे. त्यांच्यासोबत उमरखेडचे सहायक गट विकास अधिकारी गजानन पिल्लेवाड यांना नोडल अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेने प्राधिकृत केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्लीतील कर्तव्य पथ येथे 30 ऑक्टोबर रोजी भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात देशातील प्रत्येक ब्लॅाकमधून एक अमृत कलश घेवून 7 हजार 500 युवक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात जिल्ह्यातील युवकयुवती, स्वयंसेवकांना सहभागी होतील. त्यानंतर देशभरातील युवकांनी आणलेल्या अमृत कलशातील मातीपासून अमृतवाटिका निर्माण करण्यात येणार आहे. ही अमृतवाटिका तयार झाल्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत युवकांना पंचप्रण शपथ दिली जाणार आहे. त्यानंतर पंतप्रधानांच्या हस्ते या अमृतवाटिकेचे लोकार्पण होईल. हा कार्यक्रम झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रतिनिधी 1 नोव्हेंबर रोजी दिल्ली ते सेवाग्राम या रेल्वने परत येतील, माहिती या आढावा बैठकीत देण्यात आली. “ अमृत कलश यात्रेत सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांना ओळखपत्र द्यावे. सोबत असलेल्या कलशाचे पावित्र्या राखले जावे. स्वयंसेवकांना गणवेश उपलब्ध करुन द्यावा. प्रवासात प्रथमोपचार सुविधा सज्ज ठेवाव्यात. यात्रे सर्वांनी शिष्तीचे पालन करावे. गैरसोय होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी,” अशा सूचना प्रधान सचिव विकास खारगे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी