येलो मोझॅक रोगग्रस्त सोयाबीन पिकाचे पंचनामे करा - पालकमंत्री संजय राठोड

जिल्ह्यातील अनेक भागात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. याशिवाय खोडकूज, मूळकूज या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. या सोयाबीन पिकांचे कृषी विभाग आणि मदत व पुनर्वसन विभागांनी संयुक्तपणे तातडीने पंचनामे सुरू करावेत, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.
राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून सोयाबीन पिकांचे पंचनामे सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवार दि.३ ॲाक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत. त्यानुषंगाने प्रशासनाने कार्यवाही करून अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री श्री. राठोड यांनी दिल्या आहेत. पावसाचा मोठा खंड आणि सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस, हवामान व तापमानात झालेला बदल तसेच इतर काही कारणांमुळे सोयाबीनवर या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. विशेषत: चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गडचिरोली, यवतमाळ, सोलापूर, लातूर, वाशिम, नांदेड या जिल्ह्यांत हा प्रादुर्भाव दिसत असल्याने सोयाबीनचे पीक पिवळे पडत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील सोयाबीन पिकांची कृषि विभाग, शास्त्रज्ञ, विमा कंपन्यांचे अधिकारी, मदत व पुनर्वसन आणि जिल्हा प्रशासनाने पाहणी करुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि पंचनामे करावेत. नुकसान झालेल्या क्षेत्रामध्ये विमा संरक्षित क्षेत्राचा अंतर्भाव असल्यामुळे विम्याची मदत वेळेत करणे शक्य व्हावे आणि त्यांना मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळावा म्हणून प्राधान्याने पंचनामे करावेत. त्याचा अहवाल शासनास सादर करावा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिले आहेत. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. शेतकऱ्यांना योग्य ती मदत केली जाईल, नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. सोयाबीन पिकाचे पंचनामे करण्यासाठी येणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील पालकमंत्री श्री. राठोड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी