मियावाकी प्रकल्प नव्या पिढीला वनसंवर्धनाची प्रेरणा देणारा - पालकमंत्री संजय राठोड

दिग्रसच्या पर्यटन वैभवात भर घालणारा अटल आनंदवन घनवन (मियावाकी) प्रकल्प दिग्रसवासियांसह सर्वांच्या पर्यटनासाठी उपलब्ध झाला आहे. हा प्रकल्प नव्या पिढीला वनसंवर्धन व संरक्षणाची प्रेरणा देणारा ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
पुसद वन विभागाने दिग्रस शहराजवळील भवानी टेकडी परिसरामध्ये उभारलेल्या अटल आनंदवन घनवन या मियावाकी प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी आयोजित उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर यवतमाळ वनवृत्ताचे वनसंरक्षक वसंतराव घुले, पुसद वन विभागाचे उपवनसंरक्षक डॅा. बी.एन.स्वामी, सहायक वनसंरक्षक साईनाथ नरोड, तहसिलदार सुधाकर राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी अजय राऊत, राजकुमार वानखेडे, उत्तमराव ठवकर, सुधीर देशमुख, रविंद्र अरगडे, ॲड. विवेक बनगिनवार, प्रणित मोरे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री संजय राठोड यांनी मियावाकी प्रकल्पाचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करुन म्हणाले की, वन विभागाने उजाड जमिनीवर विविध झाडे लावून परिसराचा कायापालट केला आहे. ही कौतुकाची बाब आहे. आज आपण एका संक्रमण परिस्थितीला सामोरे जात आहोत. ग्लोबल वार्मिंगचा प्रभाव दिसून येत आहे. अनेक भागात मानव-वन्यप्राण्यांत संघर्षाच्या तक्रारी होत आहेत. आपण वन्यजीवांच्या हद्दीत चाललो का, हा देखील विचार करण्याची गरज आहे. ऋतुचक्र बदलल्याचे अनुभव येत आहे. पूर्वीच्या ऋतुचक्रासाठी वनसंरक्षण केले पाहिजे. जैवविविधतेचे चक्र पाळले पाहिजे. लोकांमध्ये वन व वन्यप्राण्यांचे संरक्षण करण्याची भावना रुजवण्याची गरज आहे. वन संरक्षण केल्यास निसर्ग टिकून राहील. वन विभागही त्यादृष्टीने सातत्याने प्रयत्न करीत आहे. नव्या पिढीला वने, पशुपक्षी, वन्यप्राण्यांविषयी माहिती व्हावी या दृष्टिकोणातून या भवानी टेकडी उद्यानात सुविधा निर्माण करावी. राज्याचा वन मंत्री असतांना लोकांच्या मागणीनंतर वन विभागाच्या माध्यमातून परिसराचा विकास करण्याचा निर्णय घेतला. या माध्यमातून दिग्रसवासियांसह शाळकरी विद्यार्थी, पर्यटनप्रेमींसाठी पर्यटनाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. येणाऱ्या काळात या भागाचा अजून विकास होणार आहे. वन विभागाला निधी उपलब्ध करुन दिला आहे. या परिसरात पर्यटक, विद्यार्थ्यांना वन्यजीव व वनसंवर्धनाविषयी माहिती होण्यासाठी सर्वस्तरावरचे गार्डन तयार झाले पाहिजे. वन विभाग हा जनहिताचे कार्य करणारा विभाग आहे, ही भावना नागरिकांनी बाळगली पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री श्री. राठोड यांनी व्यक्त केली. यावेळी यवतमाळ वन वृत्ताचे वनसंरक्षक वसंतराव घुले यांनी प्रास्ताविकात मियावाकी प्रकल्पाची आणि वनविभागाच्या विविध योजनांची माहिती देवून वनसंवर्धनाचे आवाहन केले. मियावाकी प्रकल्प : मियावाकी ही जपानी वनस्पतिशास्त्रज्ञ अकिरा मियावाकी यांनी तयार केलेली पद्धत आहे. हे जंगल जलद वाढण्यास, घनदाट आणि नैसर्गिक होण्यास मदत करते. या पद्धतीमध्ये उजाड जमीनीवरही अनेक प्रकारची झाडे एकत्र लावता येतात, ज्यामुळे प्रजातींमध्ये संतुलित वातावरण निर्माण होते. परिणामी, झाडे दहापट वेगाने वाढतात आणि जंगले सामान्यापेक्षा ३० पट घनदाट होतात. या पद्धतीमध्ये केवळ स्थानिक देशी झाडे लावली जातात. याच पद्धतीने दिग्रसमधील भवानी टेकडी परिसरातील कोलुरा गावात वन विभागाने एक हेक्टर मुरबाड जमिनीचा पोत सुधारुन वनीकरणासाठी जागा तयार करुन या जागेवर तीस हजार रोपांची लागवड केली आहे. या अटल आनंदवन धनवन (मियावाकी) प्रकल्पात आवळा, आंबा, पेरु, फनस, वड, पिंपळ, बकुली, निम, कांचन, सिताफळ, चिकू, डाळींब अशी विविध रोपे लावण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी