‘हर घर तिरंगा’ अभियानात उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवा सायकल रॅलीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यांचा नागरिकांना संदेश · स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 75 किलोमीटर सायकल रॅली · उमरी हुतात्मा स्मारकाला अभिवादन

यवतमाळ, दि. 9 ऑगस्ट : ‘हर घर तिरंगा’ अभियानात नागरिकांनी उत्सफुर्तपणे सहभागी होऊन 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सायकल रॅलीच्या माध्यमातून केले आहे. जिल्हा प्रशासन, नगरपालीका, यवतमाळ सायकल क्लब व क्रिडा भारती सायकलींग ग्रुप यांच्या वतीने स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षानिमित्त 75 किलोमीटर सायकल रॅलीचे आयोजन आज करण्यात आले होते. या रॅलीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी ललिलकुमार वऱ्हाडे, तहसिलदार कुणाल झाल्टे, प्रदिप मानकर, यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी तसेच सायकलींग ग्रुपचे सदस्य सहभागी झाले होते. ही रॅली समता मैदान यवतमाळ येथून निघून उमरी येथे पोहचली. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी उमरी येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले तसेच या स्मारकात स्वात्रंत्र्य सेनानींच्या छायाचित्रासोबत त्यांची माहिती लावण्याचे व स्मारकाच्या देखभालीसंदर्भात संबंधीतांना सूचना दिल्या. पुढे बाभुळगाव, नायगाव, वेणी, कोटा, कळंब, चापर्डा मार्गाने येतांना या गावात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते तिरंगा विक्री केद्राचे उद्घाटन व नागरिकांना तिरंग्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी कळंब येथे उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, तहसिलदार सुनिल चव्हाण व इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. याचप्रसंगी जिल्हा प्रशासन व यवतमाळ नगरपरिषदेद्वारे शहरात देखील सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. समता मैदान येथे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी हिरवी झेंडी दाखवुन या सायकल रॅलीचा प्रारंभ केला. ही रॅली यवतमाळ शहरातील हनुमान आखाडा चौक, पाच कंदील चौक, जाजु चौक, हिंदी हायस्कूल, विर वामनराव चौक, दाते कॉलेज, आर्णी नाका चौक, संविधान चौक, मेडीकल चौक, वाघापुर नाका, स्टेट बँक चौक, कॉटन मार्केट चौक असे मार्गक्रमण करत या सर्व चौकातील स्मारक व महापुरुषांच्या प्रतिमा व पुतळ्यांना अभिवादन केले. सायकल रॅलीत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या नेतृत्वात हौशी सायकलस्वार तथा न.प.चे शालेय विद्यार्थी शिक्षक शिक्षिका, अंभ्याकर कन्या शाळा सायकल चमु, महसुल कर्मचारी, नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. दोन्ही रॅलीची सांगता यवतमाळ येथे समता मैदानात (पोस्टल ग्राऊंड) करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी