वृक्षसंवर्धनातून पुढील पीढीसाठी हिरवळ जोपासा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वृक्षरोपण यवतमाळ, दि. 14 ऑगस्ट (जिमाका) :- नवीन झाडे लावून त्यांचे संवर्धन करणे व आपल्या गावातील हिरवा परिसर पुढील पिढीसाठी जतन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे विशेषत: युवकांनी यासाठी पुढे येण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वराज सप्ताहात यवतमाळ जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धन शपथ कार्यक्रमाचे आयोजन आज करण्यात आले होते. याअंतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचे हस्ते यवतमाळ जवळील किन्ही व नेर तालुक्यातील बोरगाव (लिंगा) येथे वृक्षारोपण करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रंसगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) पंकज भोयर, जिल्हा कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, गटविकास अधिकारी केशव गड्डापोळ, सरपंच (किन्ही) ज्ञानेश्वर गोहाडे, सरपंच (बोरगाव) प्रवीण आडे प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी प्लॅस्टीकचा वापर टाळण्याचे व पर्यावणपुरक गोष्टीचा आपल्या जीवनशैलीत अंगीकार करण्याचा निश्चय करण्याचे सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमात आपला सहभाग नोंदविण्याचे व गावातील विकासात आपले योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी मोबाईलच्या या नवीन युगात निसर्गासोबत राहण्याचं महत्व सांगून वृक्षरोपणतून जंगलाचा परिसर जोपासण्याचे आवाहन केले. यापंसगी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले तसेच उपस्थितांना पर्यावरण संवर्धनाची शपथ देण्यात आली. किन्ही येथे आज अमृत महोत्सवानिमित्त 75 झाडे लावण्यात आली तसेच यापुर्वी तेथे दोन हजार झाडे लावण्यात आली होती. तर बोरगाव येथे एकूण 1200 झाडे लावण्यात येत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त किन्ही गावात दिंडी काढण्यात आली तसेच रक्षाबंधन निमित्त जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लहान मुलींनी राखी बांधली. बोरगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थी विविध महापुरूषांच्या वेषभुषेत उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी