पदयात्रेच्या माध्यमातून 'घरोघरी तिरंगा' फडकवण्याचा संदेश शहरातील मुख्य मार्गावरून पदयात्रेचे मार्गक्रमण 75 फूट तिरंगा ध्वज ठरला पदयात्रेतील आकर्षण

जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा पदयात्रेत सहभाग यवतमाळ दिनांक 12 ऑगस्ट जिमाका:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 'घरोघरी तिरंगा' ध्वज फडकवण्याचा संदेश देण्यासाठी आज सकाळी जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्या वतीने पदयात्रा काढण्यात आली. 'वंदे मातरम' आणि 'जय हो' सारख्या देशभक्तीपर गीतांनी संपूर्ण पदयात्रेमध्ये नवचैतन्य निर्माण केले होते. यावेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे चौका - चौकात पदयत्रेत सहभागी अधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. 75 मीटर लांबीचा तिरंगा या पदयात्रेचे मुख्य आकर्षण ठरले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातही जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रत्येक ग्रामपंचायत, शाळा, महाविद्यालय, अंगणवाडी, शासकीय कार्यालय तसेच खाजगी कार्यालयाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घरावर तिरंगा ध्वज फडकवावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज सकाळी साडेनऊ वाजता जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला. 75 फूट तिरंगा खांद्यावर घेत ही पदयात्रा शहरातील मुख्य मार्गांवरून आणि चौकातून मार्गक्रमण करत एलआयसी चौकात विसावली. ही पदयात्रा एल आय सी चौक -पोस्ट ऑफिस चौक - पुनम चौक - तिरंगा चौक -हनुमान आखाडा चौक - जय हिंद चौक - गांधी चौक - टांगा चौक - तहसिल चौक - जाजु चौक - दत्त चौक - सन्विधान चौक मार्गे एल. आय. सी. चौकात विसावली. या यावेळी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले, स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानातून आणि त्यागातून आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. 75 वर्षात देशाने प्रगती केली आहे. आप्ल्याला राष्ट्र प्रेमाची भावना आणि संस्कार आपल्या पुढच्या पिढीत रुजवायचे आहे. आपल्या देशाचे एक सुजाण नागरिक बनण्यासाठी संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या सोबतच कर्तव्याची जाणीव जबाबदारीने पार पाडून देशाला प्रगतीच्या दिशेने नेण्यासाठी आपण सर्व कटीबद्ध व्हावे आणि 13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस प्रत्येकाने स्वत:च्या घरी तिरंगा फडकवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नागरिकांना रॅलीच्या समारोपप्रसंगी केले. पोलीस अधीक्षक दिलीप भुजबळ पाटील यांनी प्रत्येक नागरिकांने घरोघरी देशाचा राष्ट्रध्वज अभिमानाने फडकवून त्याला मानवंदना देण्याचे आवाहन केले. आपण कोणतेही काम कर्तव्य भावनेने केले तर ती देशसेवाच आहे. आपल्या देशाप्रती आपल्या देश प्रेमाच्या भावनेची कटिबद्धता, प्रतिबद्धता किती आहे याचे आत्मपरीक्षण करून देशाच्या प्रगतीत हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. या पदयात्रेत यवतमाळ निवासी उपजिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झालटे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे , जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्यासह तहसिल कार्यालयाचे अधिकारी- कर्मचारी, पोलिस स्थानक अवधुतवाडी, शहर, ग्रामिण येथिल पोलिस कर्मचारी, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, तालुका आरोग्य अधिकारी, नगर परिषद मधिल अधिकारी कर्मचारी,अभ्यंकर कन्या शाळेचे विद्यार्थी, शिक्षक, राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, तसेच नागरिक सहभागी झाले होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी