स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत 'माझा दाखल खारीज - माझा अधिकार' उपक्रम Ø ५ मिनीटात ५००० दाखल खारीज उतारे वाटप Ø पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाचा अभिनव उपक्रम

यवतमाळ, दिनांक 10 ऑगस्ट :- शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी बालक जेव्हा शाळेत नाव नोंदणीसाठी जातो, तेव्हा त्याची सर्वप्रथम नोंद होते ती दाखल खारीज रजिस्टरला. विद्यार्थ्यांची नोंदणी कधी, कोणत्या वर्गात झाली, याचा शालेय स्तरावर एक अभिलेख असतो, तो म्हणजे दाखल खारीज रजिस्टर. विद्यर्थ्याचे स्वतःचे वय व अधिवास प्रमाणपत्र तसेच जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी हमखास लागणारे कागदपत्र म्हणजे दाखल खारिज रजिटर होय. पांढरकवडा प्रकल्प कार्यालयाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत 'माझा दाखल खारीज - माझा अधिकार' हा अभिनव उपक्रम राबवत ५ मिनीटात ५ हजार दाखल खारीज उतारे आज वाटप केले. खरेतर दाखल खारीज व खारीज ह्या दोन बाबी भिन्न आहेत. प्रवेश घेताना त्याची नोंद दाखल या रकान्यात व विद्यार्थी शाळा सोडून इतर शाळेत जातो त्यावेळी खारीज या रकान्यात नोंद केली जाते. विद्यार्थ्यांची शाळेत नाव नोंदणी केली जाते. तो दररोज शाळेतही जातो. पण त्याच्याकडे शाळेत नोंदणी, कधी झाली याचा काहीही शासकीय पुरावा राहत नाही. हल्ली शाळेत ओळखपत्र दिले जाते. परंतु ते त्या एका वर्षासाठी ग्राह्य मानले जाते. विद्यार्थ्यांची नोंदणी कधी, कोणत्या वर्गात झाली, याचे एका शालेय स्तरावर एक अभिलेख असतो, तो म्हणजे दाखल खारीज रजिस्टर ह्या रजिस्टरच्या नोंदी आहे तशा आहे त्या नमुन्यात दिल्या जातात. तो उतारा म्हणजेच दाखल खारीज उतारा' होय. दाखल खारीज उताऱ्याची ची गरज कधी ? १) विद्याथ्यांचे स्वतःचे वय व अधिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी. २) स्वतःचे जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी तर हमखास लागणारे प्रमाणपत्र / उतारा आहे आणि त्यातल्या त्यात प्राथमिक शाळेचा दाखल खारीज उतारा मागितला जातो. त्या दाखल खारीज उताऱ्याला एक अनन्य साधारण महत्व आहे. ३) विद्यार्थ्याच्या वहीणीचे / भावाचे / वडीलाचे जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र काढताना. ४) सद्यस्थितीत जात प्रमाणपत्र पडताळणी म्हणजेच जात वैधता प्रमाणपत्र ही ११/१२ वी विज्ञान शिकत असताना केली जाते. ५) जात वैधता प्रमाणपत्र शिक्षण / निवडणूक / नोकरी (सेवा) व इतर अशा ४ कारणाने मिळते. (६) विद्यार्थ्याला इयत्ता ११/१२ वी विज्ञानमध्ये शिक्षण घेताना जात वैधता प्रमाणपत्र प्रस्ताव त्या-त्या समितीला सादर करताना अर्जदाराला प्राथमिक शाळेचा दाखल खारीज उतारा मागितला जातो. तेव्हा त्या विद्यार्थ्याने ती शाळा पालकांच्या नोकरीच्या कारणाने, पुढील शिक्षणाची सोय त्या ठिकाणी नसल्याकारणाने सोडलेली असते किंवा इतर कारणाने सोडली असते किंवा इतर विद्या शाखेच्या उदा. कला, वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना त्यांना नोकरी भेटल्यावर किंवा भविष्यात कोणत्याही प्रकारची निवडणूक लढविताना किंवा शासनाच्या एखाद्या योजनेचा फायदा घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते आणि त्यासाठी प्राथमिक शाळेचा दाखल खारीज उतारा मागितला जातो. अशा वेळी प्राथमिक शाळेत जावे लागते व त्याची मागणी करावी लागते. त्यामध्ये बराचसा वेळ वाया जातो. खर्च वाढतो व श्रम ही लागतात. काही ठिकाणचे अभिलेख जिर्ण होतात, नोंदी भेटत नाहीत. हाच खर्च, वेळ, श्रम वाया जाऊ नये यासाठी विद्यार्थी शिकत असतानाच प्रत्येकाला दाखल खारीज उतारा मिळावा या उद्देशाने प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा विवेक जॉनसन, यांच्या मार्गदर्शनाखाली व गोदाजी सोनार, सहायक प्रकल्प अधिकारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात मुख्याध्यापकांची सभा घेऊन त्यांना या उपक्रमाचा उद्देश समजावून सांगितला. त्यांना त्या-त्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थी संख्या विचारात घेऊन त्या-त्या वर्गशिक्षकाला त्या वर्गातील विद्यार्थ्याच्या संख्येइतके दाखल खारीज उतारे पुरविणे व एका आठवडयात पूर्ण लिहून त्याचे संकलन केले. एकाच दिवशी एकाच वेळी शाळेच्या प्रार्थनेच्या वेळी संबंधित वर्ग शिक्षकाकडून प्रकल्प कार्यालयाच्या नेमून दिलेल्या नोडल अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली आज 10 ऑगस्ट रोजी वाटप करण्यात आले. साधारणपणे ११.०० ते ११.०५ या ५ मिनीटात या प्रकल्प कार्यालयाच्या १८ शासकिय व २८ अनुदानित शाळेत शिकणाऱ्या ५००० विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वाटपाची मोहीम यशस्वी करण्यात आली. याकरिता सर्व शासकीय व अनुदानित आश्रम शाळेचे मुख्याध्यापक , शिक्षक आणि कार्यालयाचे अधिकारी तसेच कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी