जिल्हाधिकारी यांची पुसद उपविभागात भेट व आढावा

यवतमाळ, दि 4 ऑगस्ट : जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी 2 ऑगस्ट रोजी पुसद येथे भेट देवून उपविभागीय कार्यालयात तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावा घेत कामकाजात गतीमानता आणण्याचे निर्देश दिले. त्यांनी कृषी विभाग व माविम यांनी गावागावात एकत्रीतपणे बैठका घेवून शेतकरी गटांचा पोखरा योजनेत तसेच सुक्ष्म अन्न प्रक्रीया उद्योग उभारणीत सहभाग वाढविण्याच्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी यांनी अतिवृष्टीमुळे नुकसाणीची सद्यास्थिती व पंचनामे, पीक कर्ज वाटप याबाबत माहिती घेतली. जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक गावात घरोघरी नळ योजना सुरू करण्याचे काम किती झाले व उर्वरित कामाचे अंदाजपत्रक सादर करण्याच्याही सूचना पाणीपुरवठा विभागाला दिल्या. याप्रसंगी वन विभागाने इसापूर भागातील वनात पर्यटकांसाठी तसेच पक्षीप्रेमींसाठी सफारी अथवा नाविण्यपुर्ण उपक्रम सुरू करता येईल का याबाबत चाचपणी करण्याचे सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाने पुसद ते दारव्हा मार्गाचे संथगतीने होत असलेले काम कंत्राटदाराकडून तातडीने पुर्ण करण्याचे व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम पुर्ण करण्याचे सांगितले. जिल्हाधिकारी यांनी कार्यकारी अभियंता यांचेसह या रस्त्याची पाहणी देखील केली व नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी रस्ता सुरळीत करण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या. आरोग्य यंत्रणेने कोरोना लसिकरणाचा वेग वाढविण्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी वेणी खुर्द व शिळोणा या गावात भेट दिली. वेणी येथे किटकनाशकाची सुरक्षीत फवारणी, हाताळणी व वापर करण्याबाबत आयोजित शिबीरात त्यांनी मार्गदर्शन केले. लाभार्थी शेतकऱ्यांना त्यांच्या हस्ते फवारणी सुरक्षा किट तसेच रेशन कार्डचे वाटप करण्यात आले. पोकरा योजनेचा लाभ घेण्याचे व पशुधनासाठी किसान क्रेडीट कार्डचा लाभ घेण्याबाबत त्यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. त्यांनी येथील शेततळे व कृषी अवजान बँकेचीदेखील पाहणी केली. शिळोणा या आदर्श गावात भेट देवून तेथील ग्रामपंचायत कार्यालय व शाळेची पाहणी करून ग्रमास्थांशी संवाद साधला. जिल्हाधिकारी यांनी यवतमाळ जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या पुसद तालुक्यातील शेंबाळ पिंपरी येथे अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली तसेच ग्रामपंचायत कार्यालयात भेट देवून स्थानिक नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. याप्रसंगी त्यांनी इसापूर धरणाला भेट देवनू धरणाचा जलसाठा, पाणीपातळी तसेच सांडव्याच्या द्वाराची तपासणी करून सुरक्षेचा आढावा घेतला. यावेळी उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, तहसिलदार राजेश चव्हाण, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी आत्माराम धाबे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत नाईक, सार्वजनिक बांधकाम विभाग पुसदच्या कार्यकारी अभियंता, तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी