जाणून ध्वज संहिता… अभिमानाने फडकवू तिरंगा…

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशाने व आपल्या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी ‘स्वराज्य महोत्सव’ साजरा करण्यात येत असून त्याअंतर्गत दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तसेच सर्व शासकीय व खाजगी संस्थांनी त्यांच्या इमारतीवर स्वयंस्फूर्तीने आपल्या देशाचा मान व अभिमान असलेला तिरंगा झेंडा फडकावायचा आहे. ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम उत्साहात साजरा करतांना राष्ट्रध्वज संहितेचेही पालन होणे आवश्यक आहे. जाणते-अजाणतेपणी राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी राष्ट्रध्वज फडकविण्याचे नियम, ध्वज कसा असावा, काय करावे व काय करू नये याबाबत भारतीय ध्वज संहितेतील महत्वपूर्ण मार्गदर्शक सूचना व नियम आपण जाणून घेवू या… केंद्रीय गृह विभाग यांच्या दिनांक 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसूचनेनुसार भारतीय ध्वज संहिता-2002 भाग-1 मधील परिच्छेद 1.2 मध्ये सूचविलेल्या बदलानुसार आता राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत/पॉलिस्टर/लोकर/सिल्क/खादी कापडापासून बनविलेल्या कापडाचे असावेत असा उल्लेख करण्यात आलेला आहे. त्यानुसार ‘हर घर तिरंगा’ उपक्रमांतर्गत आपला राष्ट्रध्वज हा हाताने कातलेला किंवा विणलेला अथवा मशीनद्वारे तयार केलेला असावा. सूत, पॉलिस्टर, सिल्क, खादी किंवा लोकरीपासून तयार केलेला तिरंगा चालेल. प्लास्टिक किंवा कागदी झेंडा फडकवू नये. ध्वज संहितेतील कलम 1.3 नुसार राष्ट्रध्वजाचा अर्थात तिरंगाचा आकार हा आयताकृती असेल. ध्वजाची लांबी व उंची (रुंदी) 3:2 या प्रमाणात असावी. तिरंगा फडकवताना नेहमी झेंड्यातील केशरी रंग हा वरच्या बाजूने आणि हिरवा रंग हा जमिनीच्या बाजूने राहील, याची काळजी घ्यावी. यात चूक केल्यास तो तिरंग्याचा अवमान समजण्यात येतो. राष्ट्रीय ध्वज लावताना स्तंभाच्या वरच्या टोकावर आणि स्पष्ट दिसेल अशा रितीने लावावा. त्याला स्तंभाच्या मध्ये अगर खाली किंवा इतरत्र लावू नये. राष्ट्रध्वज लावताना, इतर सजावटी वस्तु लावू नये, केवळ फडकवण्याआधी त्यात फुले किंवा पाकळ्या ठेवण्यास मनाई नाही, तसेच राष्ट्रध्वज उतरवताना पूर्ण सावधानतेने आणि सन्मानाने हळूहळू उतरवावा. ध्वजाचा कोणत्याही प्रकारच्या पोषाखाचा अथवा गणवेशाचा भाग म्हणून वापर करता येणार नाही किंवा त्यांचे उशा, हातरूमाल, हातपुसणे किंवा कोणत्याही पोषाख साहित्यावर भरतकाम करता येणार नाही, तसेच छपाई करता येणार नाही. ध्वजावर कोणत्याही प्रकारची अक्षरे लिहता येणार नाही. ध्वजाचा कोणतीही वस्तू घेण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. ध्वजाचा जाणीवपूर्वक भूमिशी किंवा जमिनीशी स्पर्श होऊ देऊ नये किंवा तो पाण्यावरून फरफटत नेऊ नये. सर्वसाधारण जनतेला मोटार वाहन, रेल्वे गाडी यावर ध्वज लावता येणार नाही. ध्वजाचा एखाद्या इमारतीचे आच्छादन म्हणून वापर करता येणार नाही. ध्वजाचा केशरी रंगाचा पट्टा खालच्या बाजूस येईल अशा प्रकारे जाणीवपूर्वक ध्वज लावता येणार नाही. ज्या-ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून आणि तो स्पष्ट दिसेल अशा रीतीने लावला पाहिजे. फाटलेला अथवा चुरगळलेला ध्वज लावण्यात येऊ नये. राष्ट्रध्वज अन्य कोणताही ध्वजासोबत किंवा ध्वजांसोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये. ध्वजाचा तोरण,गुच्छ,अथवा शोभेसाठी उपयोग करू नये.जेव्हा ध्वज मोकळ्या जागेत लावायचा असेल तेव्हा हवामानाची स्थिती विचारात न घेता शक्यतोवर तो सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यंत लावण्यात यावा. ध्वज फाटेल अथवा अशा रीतीने बांधू नये. जेव्हा ध्वज फाटला किंवा गळल्यामुळे खराब झाला असेल तेव्हा जाळुन किंवा त्यांची प्रतिष्ठा राखली जाईल अशा रीतीने संपूर्णपणे नष्ट करावा. कोणत्याही व्यक्तीस किंवा वस्तूस मानवंदना देण्यासाठी ध्वज खाली आणू नये. ध्वजाचा जाहीरातीच्या कोणत्याही स्वरूपात वापर करता येणार नाही अथवा ध्वज फडकविण्यात आलेल्या ध्वजस्तंभाचा एखादे जाहिरात चिन्ह लावण्यासाठी वापर करता येणार नाही. ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमांतर्गत दिनांक १३ ते १५ ऑगस्ट हे तीन दिवस घरेाघरी तिरंगा फडकविताना सर्वसामान्य नागरिकांना दररोज संध्याकाळी तिरंगा खाली उतरावयाची आवश्यकता नसल्याचे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पंरतु कार्यालय व संस्थांना यासंबधी ध्वज संहितेचे नियम पाळणे आवश्यक राहील. ध्वजाचा आदर करणे हे देशाच्या प्रत्येक नागरिकांचं आद्य कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान करणे व त्याची विटंबना होणे हे बोधचिन्हे व नावे (अनूचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५० व राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम,1971 तसेच ध्वज संहितेच्या तरतूदीनुसार दंडनिय अपराध आहे. भारतीय राष्ट्रध्वज आपल्या राष्ट्राबद्दलच्या अभिमानाचं प्रतीक आहे. हा तिरंगा पूर्ण तेजाने फडकत राहण्यासाठी सशस्र सेनेच्या जवानांसह अनेक नागरिकांनी त्याचे रक्षण करण्याकरिता उदारपणाने आपले प्राण पणाला लावले आहेत. राष्ट्रध्वजाबद्दल सर्वांना प्रेम व आदर आहे आणि त्याच्याप्रती निष्ठा आहे. राष्ट्रध्वजाचा पुर्ण मान राखून घरोघरी प्रत्येक इमारतीवर आपण तिरंगा फडकवू या आणि आपले राष्ट्रप्रेम तिरंग्यातून व्यक्त करू या . . . . संकलन : गजानन जाधव, जिल्हा माहिती कार्यालय, यवतमाळ. (9923380906)

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी