नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा निष्काळजीपणे मृत्यू होणार नाही याची काळजी घ्यावी - जिल्हाधिकारी अमोल येडगे

पूर परिस्थितीचा घेतला आढावा यवतमाळ, दि १० ऑगस्ट :- वर्धा नदीच्या उगमक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे अप्पर वर्धा आणि निम्नवर्धा धरणातून वर्धा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पुढिल काही तसात बेंबळा प्रकल्पात येणाऱ्या येव्यानुसार धरणातुन पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा. विशेष करून वणी, मारेगाव, राळेगाव, कळंब, बाभुळगाव या तालुक्यातिल अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अलर्ट मोडवर काम करावे. गरज पडल्यास नागरिकांना स्थलांतरित करण्यासाठीचे नियोजन करून ठेवावे अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी आज आपत्ती व्यवस्थापन संदर्भात घेतलेल्या आढावा बैठकीत सर्व तहसीलदार आणि उपविभागीय अधिकारी यांना दिल्यात. सद्यस्थितीत बेंबळा प्रकल्पातून विसर्ग कमी झालेला असला तरी मध्य प्रदेश मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे. सध्या अप्परवर्धा धरण 88 टक्के भरले असून त्यातून 3800 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्याचबरोबर निम्न वर्धा धरणातून 3549.82 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. पाऊस असाच सुरू राहिल्यास धरणातील विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता आहे अशी माहिती अप्परवर्धा आणि निम्नवर्धा धरणाचे कार्यकारी अभियंता यांनी दिली. तसेच ईसापुर धरण हे 96 टक्के भरलेले असून सध्या विसर्ग 611 क्युमेक्स सुरू आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत नसला तरी इतर जिल्ह्यातील धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे आपल्या जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. पुढचे सात दिवस पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात वाढू शकतो, याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे नियोजन करावे . यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी गावातच राहावे. पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या गावांमध्ये दवंडीद्वारे अलर्ट सूचना द्यावी. जीवित हानी टाळण्यासाठी नाल्यावरून पाणी वाहत असताना निष्काळजीपणे नाल्याच्या पाण्यातून कुणीही वाहन चालवणार नाही यासाठी सुद्धा गावामध्ये सूचना देण्यात याव्यात. मागील पावसामुळे झालेले नुकसान आणि आता आलेला पाऊस आणि पुरामुळे नवीन मंडळामध्ये झालेले नुकसान याची माहिती शासनाकडे पाठवण्यात आलेली आहे. आताच्या पावसामुळे झालेले नुकसानीचे पंचनामे तातडीने करावे. त्यानुसार निधी प्राप्त झाल्यास त्याचे वाटप तत्परतेने होईल याची काळजी घ्यावी. तसेच मृत्यू झालेल्या प्रकरणात तातडीने मदतीचे वाटप करावे. तालुक्याला जिल्हा चमुची गरज भासल्यास तसे तात्काळ जिल्हयाला कळवावे अशा सुचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. यावेळी दूरदृष्य प्रणाली द्वारे सर्व तहसीलदार उपविभागीय अधिकारी, बेंबळा प्रकल्प, निम्न वर्धा प्रकल्प कार्यकारी अभियंता आणि अप्पर वर्धा प्रकल्प तसेच ईसापूर धरण कार्यकारी अभियंता उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी