समाजभूषण अक्षरतपस्वी द.तु. नन्दापुरे ह्यांचा जिल्ह्याला अभिमान - निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समिती’तर्फे सत्कार

यवतमाळ, दि 3 ऑगस्ट (जिमाका) :- जुन्या पीढीतील आदर्श शिक्षक, प्राचार्य, विविध पुस्तकांचे लेखक, स्वत:चे कपडे स्वत: चरख्यावर सुत कातून तयार करणारे समाजभूषण, अक्षरतपस्वी, महाराष्ट्र राज्य महाकवी कालिदास संस्कृत साधना पुरस्कार यासह अनेक पुरस्काराचे मानकरी द.तु.नन्दापुरे उर्फ दत्तानन्द यांचा यवतमाळ जिल्ह्याला सार्थ अभिमान असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांचा सत्कार करतांना मनस्वी आनंद होत असल्याचे उद्गार निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांनी आज काढले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत जिल्हा प्रशासनाद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत असून याअंतर्गत स्वातंत्र्याचा इतिहास व स्वातंत्र्य सैनिकांची माहिती प्रसारीत करावयाची आहे. यासाठी जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांची समन्वय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या उपसमितीतर्फे द.तु.नन्दापुरे यांचा सत्कार निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आला. या उपसमितीमध्ये ज्येष्ट पत्रकार न.मा.जोशी, राजकुमार भितकर, श्रीकांत राऊत, गायक प्रा. राहुल एकबोटे, आकाशवाणीचे प्रमोद बावीस्कर व मंगला माळवे यांचा समावेश असून हे सर्व समिती सदस्य सत्कार कार्यक्रमाला उपस्थित होते. द.तु.नन्दापुरे यांनी यावेळी बोलतांना सांगितले की माझा जन्म 1935 साली झाला असून समज आल्यापासून मी महात्मा गांधी यांच्या मार्गावर व साने गुरूजींच्या आदर्शानुसार साधेपणाने आपले जीवन जगत आहे. आपल्याला मिळालेल्या स्वात्रंत्र्यासाठी अनेकांनी आपल्या सुखाचे बलीदान देवून कष्ट उपसले तर कित्येकांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली आहे, नवीन पीढीने याची जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले. याप्रंगी जेष्ठ पत्रकार न.मा.जोशी यांनी प्रास्ताविकेतून द.तु. नन्दापुरे यांच्या जीवनकार्याची माहिती दिली. भगवद् गीतेचा पद्यानुवाद करणाऱ्या 36 लेखकांमध्ये द.तु.नन्दापुरे यांचा समावेश असून त्यापैकी आजरोजी ते एकमेव हयात असल्याचे त्यांनी सांगितले. तर राजकुमार भितकर यांनी जिल्ह्यातील स्वातंत्र्याचा इतिहास व स्वातंत्र्य सैनिकांची माहिती प्रसारित करण्यासाठी द.तु. नन्दापुरे यांचे जीवनकार्यापासून प्रेरणा घेवून समिती आपले काम करेल असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन आकाशवाणीच्या निवेदक मंगला माळवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार जिल्हा माहिती अधिकारी मनिषा सावळे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा माहिती कार्यालयाचे उपसंपादक गजानन जाधव, अपर्णा नंदापूरे, निरजा नवले, अविनाश नवघरे इ. उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी