वाचनाप्रती अग्रही भूमिका ठेवा

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचा विद्यार्थ्यांना संदेश
यवतमाळ, दि. 8 ऑगस्ट : आपल्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थी, युवापिढी तसेच पालकांनी नियमित वाचन करावे, तसेच नागरिकांना वाचनालयाकडे वळविण्यासाठी ग्रंथालय संघाने पुढाकार घ्यावा, असे मत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज व्यक्त केले. जिल्हा ग्रंथालय कार्यालय व यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सार्वजनिक अनुदानित वाचनालयाचे कर्मचारी व पदाधिकारी यांची ग्रंथालयीन कार्यशाळा तसेच उच्च माध्यमिक व माध्यमिक तसेच शालांत परिक्षेत यावर्षी विशेष प्राविण्य प्राप्त करणाऱ्या वाचनालयातील कर्मचारी व पदाधिकारी यांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा आज येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अभ्यासिकेत आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अमरावती येथील सहाय्यक ग्रंथालय संचालक ए.पी.ढोणे, महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉ. गजानन कोटेवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेंद्र कोरे, यवतमाळ जिल्हा ग्रंथालय संघाचे मनोज रणखाम, प्रशांत पंचभाई प्रामुख्याने उपस्थित होते. विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार तसेच चांगले व्यक्तीमत्व निर्माण करून चांगले आयुष्य घडण्यासाठी ग्रंथालयीन पुस्तकांचे वाचन आवश्यक आहे. विद्यार्थी दशेत मी ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेवून तसेच स्थानिक ग्रंथालयातील पुस्तकांचे वाचन करूनच पुढे आलो आहे. त्यामुळे शालेय अभ्यासासोबतच नवीन-नवीन ज्ञान मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी वेगेवेगळ्या ग्रंथालयात जाऊन उपलब्ध पुस्तकांचे नियमित वाचन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. ग्रंथालय संघाने विद्यार्थ्यांना मोबाईलऐवजी पुस्कांजवळ जाण्याकरिता उद्युक्त करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हाधिकारी यांनी यवतमाळ जिल्हा ग्रंथालय कार्यालय येथे तसेच तालुका स्तरावर व मोठ्या गावात अभ्यासीका तयार करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यांनी प्राविण्यप्राप्त विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभीनंदन करून यश मिळविण्यासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी गजानन कोटेवार यांनी ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती जिल्हाधिकारी यांना केली. उपस्थितांचे आभार जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेंद्र कोरे यांनी व्यक्त केले. याप्रसंगी जिल्हा ग्रंथालयाचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रंथालय संघाचे पदाधिकारी, प्राविण्याप्राप्त विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी