सेंद्रीय शेतमालाच्या बाजारावर पकड निर्माण करा - जिल्हाधिकारी अमोल येडगे

महिला शेतकऱ्यांचा ऑर्गानिक प्रमाणपत्र देऊन सन्मान यवतमाळ, दि २२ (जिमाका) :- सेंद्रीय शेतमालाला येणाऱ्या काळात सर्वाधीक मागणी राहणार आहे तसेच प्रक्रीया केलेल्या शेतीउत्पादनांना चांगला भाव मिळतो त्यामुळे सेंद्रीय शेतीमालावरील प्रक्रीया उद्योग त्याचे ब्रॅन्डींग व पॅकिंग आत्मसात करून जास्तीत जास्त मार्केट कॅप्चर करण्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले. उमेद अंतर्गत राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पामधील सेंद्रिय शेती उपक्रम अंमलबजावणीसाठी महिला शेतकऱ्यांचा लोकल ग्रूप तयार करण्यात आला आहे. तीन वर्षाचा कालावधी पुर्ण करणाऱ्या महिला शेतकऱ्यांना कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन केंद्र येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते ऑर्गानिक प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, कृषी विज्ञान केंद्राचे समन्वय डॉ. नेमाडे, उमेदचे निरज नखाते, प्रगतीशील शेतकरी तसेच लोकल ग्रुपच्या महिला शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. विचारपुर्वक गुंवणूक व नियोजनपुर्वक कामे करण्यात महिला आघाडीवर असल्याने ज्या क्षेत्रात महिला निर्णय घेतात त्या क्षेत्रात प्रगती निश्चीत असते त्यामुळे महिलांनी शेतीकडे वळावे व वेगवेगळे प्रयोग करून नाविण्यपुर्ण उत्पादने घेण्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. पोकरा योजना, प्रधानमंत्री अन्न प्रक्रीया उद्योग, प्रधानमंत्री रोजगार योजना, मुख्यमंत्री रोजगार योजना याद्वारे मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ घेवून चांगले उद्योग उभारण्याचे आवाहनही त्यांनी केले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी रासायनिक खतांच्या प्रयोगामुळे अनेक आजार बळावत असल्याने नागरिकांचा कल सेंद्रीय शेती उत्पादनांकडे वाढत असून त्यातून चांगली आर्थीक मिळकत होत असल्याने आपण सेंद्रीय शेतीत वाढ होईल यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले. निरज नखाते यांनी प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाची माहिती दिली तर जिल्हा संसाधन व्यक्ती मिलींद कांबळे यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रीया उद्योग व सेंद्रीय कापूस शेतीबाबत माहिती दिली. याप्रसंगी जया गावंडे, गीता निवलकर, राधा पीसे, शोभा कुटे, निलीमा कांबळे, कमला गावंडे यांचा प्राधिनिधिक स्वरुपात प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शेतकरी बचत गटाच्या महिला सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी